ऑनलाईन टीम/ तरुण भारत
इतके दिवस जे गप्प होते ते आता तिथे जाऊन बोलू लागले आहेत. मातोश्रीने सन्मानाने बोलवलं आणि भाजपाशी बोलणी केली तर येऊ असं म्हणत आहेत. मी यापूर्वीही त्यांना सूरतला जाण्यापेक्षा इथेच बोला असं म्हटलं होतं. मात्र त्यांना पर्यटन करायची हौस होती, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिपक केसरकर (Uddhav Thackeray) यांच्यावर केली. (Uddhav Thackeray News)
उद्धव ठाकरेंनी बोलावलं तर आम्ही नक्की जाऊ. पण आम्हाला बोलावताना त्यांना भाजपाशीदेखील चर्चा करावी लागेल, आशीर्वाद द्यावा लागेल असं विधान शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केलं आहे. याशिवाय संजय राठोड (Sanjay Rathod) यांनीही सन्मानाने बोलावल्यास मातोश्रीवर जाऊ असं म्हटलं आहे. दरम्यान अब्दुल सत्तार यांनी हेच विधान केलं आहे. या बंडखोरांच्या विधानाला ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.
हेही वाचा- जपान हादरलं ! माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन
पुढे बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, ज्यांनी ही सगळी विकृत भाषा वापरली, अडचणी निर्माण केल्या तसंच विकृत भाषा वापरत टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात, गाठीभेटी घेत आहात, त्यांना मिठ्या मारत आहात. मग तुमचं हे प्रेम खरं आहे की तकलादू आहे? असा सवालही त्यांनी केला. ज्यांनी ठाकरे कुटुंबाचा अपमान केला, माझ्या मुलांना तर आयुष्यातून उठवण्यापर्यंतचे प्रयत्न केले अशा लोकांसोबत तुम्ही गेलातं. मग हे प्रेम खरं की खोटं हे जनतेला कळू द्या असा निशाणा ही त्यांनी साधला.









