ज्या गद्दाराला नाग समजून दूध पाजले तोच उलटा फिरून डसू लागल्याची जोरदार टिका शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांच्यावर केली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाची जाहीर सभा आज हिंगोलीत पार पडली.
शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर याच्या मतदारसंघात झालेल्या या सभेला शिवसेना कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती.
आपल्या जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सुरवातीलाच संतोष बांगर याच्यावर निशाणा साधताना संतोष बांगर यांना नागाची उपमा देऊन त्यांच्यावर सडकून टिका केली. ते म्हणाले, “मी हिंगोलीत गद्दारांसाठी आलेलो नाही. ज्या गद्दाराला नाग समजून पूजा केली तोच नाग उलटा फिरून डसायला लागला.” अशी घणाघाती टिका उद्धव ठाकरे यांनी संतोष बांगर यांच्यावर केली.
पुढे बोलताना ते म्हणाले, “काहीजणांना मी गद्दारांवर बोलेन अशी अपेक्षा असेल. पण, गद्दारांवर माझा वेळ घालवणार नसून त्यांचा समाचार घेण्यासाठी तुम्ही समर्थ आहात. मी हिंगोलीत फक्त शिवसैनिकांसाठी आलोय..गद्दांरासाठी नाही. गद्दार अनेक झालेत, मात्र हिंगोली कायम शिवसेनाप्रमुखांच्या हिंदुत्ववादी विचार आणि भगव्याच्या मागे उभी राहिली आहे.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.









