ऑनलाईन टीम / तरुण भारत :
एकनाथ शिंदे यांच्या गटाने बंड केल्याचे समजल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार वाचविण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. मात्र, शिवसेना जनसंपर्कप्रमुख हर्षल प्रधान यांनी हे वृत्त फेटाळले आहे.
19 जूनला विधान परिषदेची निवडणूक पार पडली. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 जूनला एकनाथ शिंदे यांनी 21 आमदारांसह सुरत गाठले. हळूहळू शिंदे गटातील बंडखोर आमदारांची संख्या वाढत गेली. या आमदारांना परत आणण्यासाठी शिवसेनेने बरेच प्रयत्न केले. मात्र, ते परत आले नाहीत. 21 जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निकटवर्तीयांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचे समोर आले आहे. पक्षामध्ये विभाजन होण्यापेक्षा, गुवाहाटीला गेलेले आणि मुंबईत राहिलेले आमदार, असं विभाजन न होता, हे सर्व एकत्र राहून भाजपसोबत पुन्हा शिवसेनेची युती होते का? यासंदर्भात चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
माध्यमांमधून यासंदर्भातले वृत्त प्रसिद्ध होताच शिवसेनेने हे वृत्त खोटं असल्याचा दावा केला आहे. तसेच अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. उद्धव ठाकरेंना जे बोलायचे आहे, ते खुलेआम बोलतात. कुणीही गैरसमज पसरवू नये, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.








