अध्याय एकोणतिसावा
भगवंतांनी मुक्ती प्रदान केली तरी उद्धवाची देह गमवायची इच्छा नव्हती कारण देहच नसला तर तो त्यांची भक्ती कशी करणार? म्हणून तो गुरुभक्ती करायची संधी द्या असे मागणे मागत होता. त्याला असे वाटले की, एकदा मुक्ती दिल्यावर परत देहावस्था देता येणार नाही असे भगवंत म्हणतील म्हणून तो पुढे म्हणाला, माझ्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला असे करता येणार नाही असेही मला सांगू नका कारण तुमचे सामर्थ्य मी जाणतो. तुम्ही अशक्य ते शक्य करू शकता. जे मुळातच अस्तित्वात नाही त्याला अस्तित्व देऊ शकता.
तुम्ही वानरांना श्रेष्ठत्व प्रदान केलेत. तुमच्या सामर्थ्याची सहजी कल्पना येत नाही. गौळणी ह्या केवळ सामान्य स्त्रिया पण तुमच्या कृपेने त्या इतक्या सामर्थ्यवान झाल्या की, ब्रह्मदेव त्यांच्या चरणी लोटांगण घालू लागले. विशेष म्हणजे तुम्ही परमात्मा परमेश्वर आहात, हे ना त्या गौळणीना माहित होते ना त्या वानरांना पण केवळ तुझे भजन केल्याचे फल म्हणून त्यांना परब्रह्माची प्राप्ती झाली असा तुमच्या भजनाचा अगाध महिमा आहे. तुम्ही संपूर्णपणे भक्ताच्या अधीन असता असे असताना तुमच्या भक्तीपुढे मोक्षाचे महत्त्व ते काय? भक्ती हीच मुख्य असून तिच्यापोटीच मुक्तीचा जन्म होतो. असं जरी असलं तरी मुक्तीचे एव्हढे महत्त्व लोकांना वाटते की, तिच्यापुढे भक्तीला गौणत्व येते.
ह्याप्रमाणे आपल्याच आईची हत्या करणाऱ्या मुक्तीचे मला तरी देवा काहीच महत्त्व वाटत नाही. मुक्तावस्थेतला मुख्य दोष असा की, तिच्यामुळे देहावस्था नाहीशी होते आणि त्यामुळे तुझी भक्ती करायची संधीही हुकते. आता मुक्तीचे जे दुषण मी तुला सांगितले ते कसे दूर होईल तेही सांगतो. ते जर दूर झाले तर भक्तीप्रमाणेच मुक्तीही अतिपावन होईल ह्यात काहीही शंका नाही. तेव्हा मी काय म्हणतोय ते देवा सावध होऊन ऐका. आत्तापर्यंत भगवंत उपदेश करत होते त्या प्रत्येकवेळी ते उद्धवाला सावध होऊन ऐक, मी काय सांगतोय त्याकडे नीट लक्ष दे असे सांगत होते. आता उद्धवाची भक्तीची शक्ती एव्हढी वाढली होती की, उद्धव काय सांगतोय ते देवांनी नीट ऐकावे म्हणून तो भगवंताना सांगत होता आणि देवही त्याच्यावरील प्रेमापोटी त्याचे बोलणे कौतुकाने ऐकत होते.
भक्तीची ही शक्ती उद्धवाला चांगलीच माहिती होती म्हणून तो कोणत्याही परिस्थितीत भक्ती करण्याची संधी सोडायला तयार नव्हता. म्हणून तो भगवंतांना म्हणाला, देवा, तू मला मुक्ती दिलीस तरी तुझे भजन करू शकीन अशी तू माझ्यावर कृपा कर. म्हणजे मुक्तीचे दुषण दूर होईल आणि तीही पावन होईल. कोणत्याही परिस्थितीत देवांनी आपले मागणे नाकारू नये म्हणून ते हो म्हणेस्तोवर उद्धव काही केल्या भगवंताचे पाय सोडायला तयार नव्हता.
उद्धवाचे भजनावरील अतीव प्रेम पाहून भगवंत चकित झाले. ते उद्धवावर अत्यंत प्रसन्न झाले. उद्धव पुढे म्हणाला, जर तुम्ही मला मुक्ती दिलीत तर देह नसल्याने मुक्ती हे सद्गुरूभजनात येणारे विघ्न आहे असे मला वाटते. तेव्हा सद्गुरूंची म्हणजे तुमची भक्ती निर्विघ्नपणे कशी करता येईल ते कृपा करून मला सांगा. माझे मागणे तुम्हाला कदाचित विचित्र किंवा उफराटे वाटेल. ह्यावर भगवंत मोकळेपणाने हसले आणि म्हणाले, कोटी जन्म मुक्ती मिळण्यासाठी शिणल्यावर क्वचित कोणाला तरी मुक्ती प्राप्त होते. मुळातच मुक्तीसाठी प्रयत्न करणारा लाखात एखादाच असतो कारण प्रत्येकाला प्रपंच प्यारा असतो. तो सोडून वैराग्य पत्करून, सतचिदानंद श्रीहरीची भक्ती करून मुक्ती हवी म्हणणारा विरळाच असतो. असा लाखात एखादा निघालाच तरी तो शेवटपर्यंत जाईलच अशी खात्री नसल्याने मुक्तीसाठी प्रयत्न करणाऱ्यातल्या लाखात एखाद्यालाच मुक्ती मिळते इतकी ही अप्राप्य गोष्ट आहे.
क्रमश:








