Uddhav Balasaheb Thackeray of Talekhol villagers join Shiv Sena
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे आमच्या भागातले आमदार म्हणून सांगण्यास लाज वाटते अशी परिस्थिती केसरकर यांनी आज करून ठेवली आहे. मंत्री झाल्यापासून ते आजपर्यंत आयी, विर्डी, तळेखोल, आंबडगाव, माटणे या गावांमध्ये फिरकलेले नाहीत. त्यांच्या अशा या वृत्तीमुळेच त्यांच्यावर गद्दार हा शिक्का बसला आहे. त्यांना यापुढच्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या असे प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा माटणे पंचायत समिती मतदार संघाचे माजी सदस्य बाबुराव धुरी यांनी केले.
तळेखोल येथे ग्रामस्थांनी श्री. धुरी यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी ते आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख संजय गवस, विभागप्रमुख कृष्णा पर्येकर, उपतालुकाप्रमुख मिलिंद नाईक, आयी उपसरपंच भदी गवस, शाखाप्रमुख सगुण गवस, आदी उपस्थित होते.
श्री. धुरी पुढे म्हणाले की, आयी पंचक्रोशी तसेच दोडामार्ग तालुक्यातील गावागावातून शिवसेनेला भरघोस मतदान झाल्यामुळेच दीपक केसरकर हे आतापर्यंत आमदार व मंत्री होत गेले. मात्र त्याचा त्यांना विसर पडला आहे. उद्धव ठाकरेंशी बेईमानी करून त्यांनी भाजप व शिंदे गटाच्या सरकारात प्रवेश केला व शिक्षणमंत्री पद पटकाविले. मंत्री झाल्यापासून आयी, विर्डी, तळेखोल, वझरे, आंबडगाव, माटणे, गिरोडे या गावात ते कितीवेळा आले याचा विचार या भागातील लोकांनी करावा असेही श्री. धुरी म्हणाले. केवळ येत्या जि. प. व पं. स. निवडणुकीतच नव्हे तर पुढील आमदार निवडणुकीवेळीही केसरकर यांना आयी पंचक्रोशीत जागा दाखवून देईल असेही धुरी यांनी स्पष्ट केले.
दोडामार्ग – वार्ताहर









