अध्याय एकोणतिसावा
उद्धवाला भगवंतांनी ब्रह्मज्ञानाचा उपदेश ह्या आधीच्या अध्यायात केला. त्याने उद्धव तृप्त झाला पण त्याच्या हेही लक्षात आले की, हे ब्रह्मज्ञान सामान्यातल्या सामान्य माणसालाही समजले पाहिजे म्हणजे त्याचेही कोटकल्याण होईल. त्याप्रमाणे त्याने हे ब्रह्मज्ञान सोप्यात सोपे करून सांगा अशी भगवंताना विनंती केली. त्यांची विनंती ऐकून, सामान्य जनांनाही ब्रह्मज्ञान झाले म्हणजे त्यांचाही उद्धार होईल ही उद्धवाची मनीषा भगवंताना समजली आणि ते त्याच्यावर अत्यंत प्रसन्न झाले. आधीच उद्धव देवांचा अत्यंत लाडका, त्यात त्याने सामान्य जनांबद्दल कळवळा दाखवला. हे म्हणजे त्याने अगदी भगवंताच्या काळजालाच हात घातल्यासारखे झाले. म्हणून उद्धवाच्या इच्छेनुसार, भगवंतानी ब्रह्मज्ञानाचे निरुपण जेव्हढे सोपे करून सांगता येईल तेव्हढे सोपे करून सांगितले. त्यानंतर हे ब्रह्मज्ञान जो आत्मसात करेल त्याला त्यांची प्रचीती कशी येईल हे आता ते सांगत आहेत. ते म्हणाले, ज्याने हे ब्रह्मज्ञान जाणून घेतले त्याला त्याच्या मूळ स्वरूपाचे ज्ञान झालेले असल्याने तो आता देही असून विदेही अवस्थेत राहील. तो प्रारब्धानुसार प्राप्त झालेली मायिक कर्मे कोणत्याही अपेक्षेशिवाय करून ती तो मला अर्पण करत असल्याने त्याच्या कर्मातून पाप पुण्याची निर्मिती होणार नाही. त्यामुळे त्याला कोणतेही कर्मबंधन बाधू शकत नाही. ब्रह्मज्ञानी मनुष्य देही असून विदेही असल्याने त्याला देहाचा बिलकुल लोभ नसतो. ज्याप्रमाणे सूर्यापुढे अंधार क्षणभरही टिकू शकत नाही त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानी माणसापुढे कर्माचे महत्त्व टिकू शकत नाही. तो स्वत:च जेथे निर्विकल्प असतो तेथे संकल्पविकल्पांना थारा कोठून मिळणार? हे खरे परब्रह्माचे निजस्वरूप आहे आणि तेच त्याच्या अनुभवाला येते. असे ब्रह्मज्ञान ज्याला प्राप्त होईल तोही उद्धवा तुझ्यासारखा ब्रह्मस्वरूप होईल. तो परब्रह्म झालेला असल्याने तेथे शोकमोहाला स्थान कुठून असणार? भगवंताचे हे विवेचन ऐकून उद्धवाचे उद्धवपण उडून गेले. तो देहरुपात समोर दिसत असला तरी विश्वरूप झाला. आता तो कोणत्याही कारणाशिवायच स्वानंदात निमग्न झाल्याने काहीच बोलेनासा झाला. अशातच देवांनी उद्धवाला काही प्रश्न विचारला पण त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे भानसुद्धा उद्धवाला राहिले नाही. हे भान न राहण्याचे कारण म्हणजे तो आणि भगवंत हे एकरूपच झाले होते. त्यामुळे प्रश्न विचारणारे भगवंत आणि उत्तर देणारा उद्धव अशा दोन व्यक्ती तेथे राहिल्याच नव्हत्या. उद्धवाची ही अवस्था पाहून हा आता आत्मस्वरूप झाला आहे हे भगवंतानी ओळखले. दिसायला भगवंत आणि उद्धव ह्या दोन व्यक्ती जरी असल्या तरी त्यांची हृदये एकमेकात इतकी मिसळून गेली होती की, ती एकमेकांपासून वेगळी काढणे केवळ अशक्य होते. त्यामुळे उद्धव आत्मस्वरूप झाला आहे हे त्यांना सहजी कळून आले. आपण सांगितलेल्या ब्रह्मज्ञानाची प्रचीती घेत असलेला आपला उद्धव आता आत्मस्वरूपी लीन झाला आहे हे त्यांच्या लक्षात आले. ज्याप्रमाणे शिष्याने आपल्या शिकवणुकीचे सार्थक केले हे जाणून एखादा सद्गुरु सुखाने तृप्त होतो त्याप्रमाणे उद्धवाने आत्मस्वरूप प्राप्त करून घेतले हे जाणून भगवंतांना सुखाचा मेरू पर्वत प्राप्त झाल्यासारखे झाले. मुलाच्या प्रगतीने आई सुखावते आणि त्याचे कौतुकाने पापे घेते किंवा सेवकाने शत्रूचा पराभव करून त्याला पिटाळून लावले हे पाहून राजाला खूप आनंद होतो आणि तो गुढ्या तोरणे उभी करून सेवकाचे स्वागत करतो त्याप्रमाणे शिष्याला ब्रह्मज्ञानाची प्रचीती आलेली पाहून सद्गुरू अत्यंत समाधानी होतात आणि असा शिष्य आपण घडवू शकलो हे पाहून स्वत:ला धन्य समजतात. तशीच अवस्था भगवंतांची झाली होती.
क्रमश:








