सातारा, प्रतिनिधी
Udayanraje Gifted Sword Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी 2 महिन्यांच्या राजकीय ब्रेकनंतर शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरू केली आहे.त्यांची यात्रा बुधवारी साताऱ्यातील शिखर शिंगणापूरला पोहोचली.तिथे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांना तलवार भेट दिली.पंकजाताईंचे मनगट पाहा,ते माझ्यापेक्षा मोठे आहे, अशी मिश्किल टिप्पणी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले,माझ्या बहिण पंकजा आणि माधुरी ताई श्रावण महिन्यात भेटल्या हा आज योगायोग आहे. मुंडे कुटुंबाचे ग्रामदैवत हे शिखर शिंगणापूर आहे. गोपीनाथ मुंडे यांची पावलोपावली आठवण येते. पंकजा मुंडे यांची भाषा शैली ऐकून गोपीनाथ मुंडे भाषण करत असल्याची आठवण येते, असेही उदयनराजे म्हणाले.साताऱ्यात शिखर शिंगणापूर येथे खासदार उदयनराजे आणि पंकजा मुंडे यांनी एकत्र शंभू महादेवाचे दर्शन घेतलं.
पुढे बोलताना ते म्हणाले, पंकजाताई यांचा भविष्यकाळ उज्वल आहे.हा संघर्ष म्हणता येत नाही.आजच्या काळातील त्या रणरागिणी आहेत.यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांना तलवार भेट देताना उदयनराजे म्हणाले, क्षत्रिय समाजात तलवार हे शौर्याचे प्रतिक मानले जाते. भवानी मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिली होती. मी काही देव नाही. पण एक मोठा भाऊ म्हणून मी त्यांना तलवार भेट दिली. हा समाज एकत्र ठेवण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी मी त्यांना ही भेट दिली, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.
जालना लाठीचार्ज संदर्भात बोलताना ते म्हणाले की, जरांगे पाटील उपोषण मागे घेण्यास नकार देत आहेत.जाता जाता जात नाही त्याला जात म्हणतात हे दुर्दैव आहे. कोणी कितीही चांगला असला तरी केवळ जातीमुळे तो मागे पडतो,अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.जरांगे यांचं उपोषण चुकीचे नाही.त्यांच्या मागण्या रास्त आहेत.सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे, असं भाष्य मराठा आरक्षणावर केले.