मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र : लवकरच घोषणा होण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन हे स्वत:चे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांना राज्याचे उपमुख्यमंत्रिपद देणार असल्याची चर्चा आहे. उदयनिधी हे सध्या राज्याचे युवा कल्याण आणि क्रीडा विकासमंत्री आहेत. याचबरोबर अण्णाद्रमुकचा बालेकिल्ला असलेल्या सलेम जिल्ह्यातील एकमेव द्रमुक आमदार पनामाराथुपट्टी राजेंद्रन यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते.
आगामी विधानसभा अधिवेशनात विविध विभागांच्या अनुदान मागण्यांवर चर्चा होणार आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा आणि आदर्श आचार संहिता लागू असल्याने हे अधिवेशन प्रलंबित आहे. अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान काही मोठ्या घोषणा केल्या जाणार असल्याचे द्रमुकच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर संसदेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास द्रमुक केंद्रात आघाडी सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे या नेत्याने म्हटले आहे.









