अमली पदार्थ तस्करीप्रकरणी ईडीकडून गुन्हा नोंद : चौकशी होण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि राज्याचे मंत्री उदयनिधी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अमली पदार्थ तस्करी प्रकरणी आता ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंदविला आहे. ईडीकडून आता उदयनिधी यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) आणि दिल्ली पोलिसांनी सुमारे 2 हजरा कोटीच्या इंटरनॅशनल ड्रग्स रॅकेटप्रकरणी जाफर सादिकला अटक केली आहे. जाफर हा तमिळ चित्रपट निर्माता असण्यासोबत द्रमुकचा पदाधिकारी देखील आहे.
द्रमुक मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना 7 लाख रुपये दिले होते असे जाफरने एनसीबीला चौकशीदरम्यान सांगितले आहे. यातील 5 लाख रुपये हे उदयनिधी यांना पूरग्रस्तांना मदत करणे तर दोन लाख रुपये पक्षनिधी म्हणून दिल्याचे जाफरचे सांगणे आहे.
एनसीबीही करणार चौकशी
सूत्रांनुसार एनसीबी आणि ईडी दोघांकडून तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचे पुत्र उदयनिधी यांना चौकशीसाठी बोलाविले जाऊ शकते. जाफर सादिकने उदयनिधी यांना दिलेली रक्कम ही अमली पदार्थांच्या तस्करीतून प्राप्त झाली होती का याचा तपास एनसीबी करत आहे. तर आता याप्रकरणी ईडीची एंट्री झाल्याने स्टॅलिन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ईडी लवकरच जाफरची चौकशी करणार असल्याचे मानले जात आहे.
जाफरच्या कनेक्शनसंबंधी तपास
ईडी आता याप्रकरणी अटकेत असलेल्या जाफर सादिकची चौकशी करत त्याच्या हस्तकांची तसेच पाठिराख्यांसंबंधी माहिती मिळविणार आहे. याचबरोबर ईडी टॉलिवूड तसेच बॉलिवूडमध्ये अमली पदार्थांच्या तस्करीतून कमाविलेल्या रकमेबद्दल तपास करणार आहे. अमली पदार्थांच्या तस्करीतून प्राप्त रक्कम कुठे वळविण्यात आली याचा शोध ईडीकडून घेतला जाणार आहे. आतापर्यंत याप्रकरणी 4 लोकांना अटक करण्यात आली आहे.









