सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी : सनातन विरोधी वक्तव्यांचे प्रकरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सनातन धर्माच्या विरोधात उदयनिधी स्टॅलिन आणि ए. राजा यांनी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका चेन्नईती एका वकिलाने दाखल केली आहे. द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी केली होती. तर द्रमुक खासदार राजा यांनी सनातन धर्माची तुलना एचआयव्हीसोबत केली होती. दोन्ही नेत्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण आहे.
चेन्नईच्या वकिलाने याचिकेद्वारे उदयनिधी आणि ए. राजा विरोधात एफआयआर नोंदविण्याची मागणी केली आहे. द्रमुक नेत्यांना अशाप्रकारची वक्तव्ये करण्यापासून रोखण्यात यावे, तसेच तामिळनाडूत सनातन धर्माच्या विरोधात होत असलेल्या कार्यक्रमांना घटनाबाह्या ठरविण्यात यावे असे याचिकेत म्हटले गेले आहे. अशाप्रकारच्या लोकांना सीमेपलिकडून वित्तपुरवठा प्राप्त होतोय का याची चौकशी करण्यात यावी, या नेत्यांच्या एलटीटीईशी असलेल्या संबंधांची चौकशी केली जावी अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.
याचिकाकर्त्याने शुक्रवारी स्वत:च्या याचिकेवर जलद सुनावणी करण्याची विनंती सरन्यायाधीशांना केली आहे. सुनावणीसाठी निर्धारित प्रक्रियेचे पालन करावे असे सरन्यायाधीशांनी सागितले आहे. उदयनिधी यांच्या वक्तव्यामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
सनातन धर्म सामाजिक न्याय आणि समानतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध केला जाऊ शकत नाही, तर त्यांना संपवावे लागते. डेंग्यू, मलेरिया, कोरोना या आजारंना विरोध करणे शक्य नाही, परंतु त्यांना संपविले जाऊ शकते. अशाच प्रकारे सनातन धर्माला संपविण्याची गरज असल्याचे वक्तव्य उदयनिधी यांना एका कार्यक्रमात बोलताना केले होते.









