प्रकाशचा केशववर एकचाकावर आसमान : महिलांचे आकर्षक विजय
बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव आयोजित रामचंद्र मल्लाप्पा टक्केकर व शांता रामचंद्र टक्केकर यांच्या स्मरणार्थ गोविंद टक्केकर पुरस्कृत भव्य कुस्ती मैदानात सेना दलाच्या संग्राम पाटीलने उदयकुमार दिल्लीचा एकेरी पट काढून गुण मिळवित विजय संपादन केला. तर दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत प्रकाश इंगळगीने केशव भागवतचा कोंद एकचाक डावावर चीत करुन उपस्थित कुस्ती शौकिनांची मने जिंकली. आनंदवाडी आखाड्यात प्रमुख कुस्ती सेनादलचा आंतरराष्ट्रीय संग्राम पाटील व राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता उदयकुमार दिल्ली ही कुस्ती पुरस्कर्ते गोविंद टक्केकर, अंजली पाटील, परशुरामभाऊ नंद्याळी, मारुती घाडी, नवरतनसिंग पोवार, संतोष होंगल, हिरालाल चव्हाण, रवी बिर्जे, सुरज घाडी आदी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत पहिल्याच मिनिटाला संग्रामने एकेरी पट काढून उदयकुमारला खाली घेण्याचा प्रयत्न केला. त्यातच उदयकुमारने कलाजंक मारुन संग्रामला खाली घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून उदयने सुटका करुन घेतली. 4 थ्या मिनिटाला संग्रामने उदयकुमारला दुहेरी पट काढून हाताची सांड लावून नाकपट्टी लावून चीत करण्याचा प्रयत्न केला. पण बलदंड शरीराच्या उदयकुमारने त्यातून सुटका करुन घेतली. आठव्या मिनिटाला संग्रामने पायाला चाट मारुन उदयकुमारला खाली घेण्याचा प्रयत्न केला. त्यातच उदयकुमारने खालून कलाजंक मारुन संग्रामला खाली घेतले. पण संग्रामने आपल्या ताकदीच्या जोरावर त्यातून सुटका करुन घेत खालून पुट्टी मारुन पुन्हा उदयकुमारवर ताबा मिळवित पायाला एकलांगी भरुन चीत करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. वेळे अभावी 24 व्या मिनिटाला पंच कृष्णा पाटील व मारुती घाडी यांनी कुस्ती गुणावर निकाल करण्याचा निर्णय घेतला. यावेळी संग्राम पाटीलने एकेरी पट काढत उदयवर ताबा मिळवित विजयी गुण घेतला.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती राष्ट्रीय पदक विजेता प्रकाश इंगळगी व महाराष्ट्र चॅम्पियन कोल्हापूरचा केशव भागवत ही कुस्ती रमाकांत कोंडुस्कर, वसंत ताशिलदार, सुनील जाधव, माधुरी जाधव, विशाल सावंत, दत्तत्रय कोरविनकोप आदी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत 3 ऱ्या मिनिटाला प्रकाश इंगळगीने एकेरी पट काढून पायाला आकडी लावून चीत करण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून केशव भागवतने सुटका करुन घेतली. 4 थ्या मिनिटाला केशव भागवतने दुहेरी पट काढून प्रकाशला खाली घेत घीस्सा मारण्याचा प्रयत्न केला. पण प्रकाशने त्यातून सुटका करुन घेत केशव भागवतवर कब्जा मिळविला. 9 व्या मिनिटाला प्रकाश इंगळगीने एकेरी पट काढत केशव भागवतला खाली घेत एकलांगी भरत चीत करण्याचा प्रयत्न केला. खालून पुट्टी मारुन केशव भागवतने बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असताना प्रकाश इंगळगीने कोंद एकचाक मारुन केशव भागवतवर प्रेक्षणीय विजय मिळविला. तिसऱ्या क्रमाकाच्या कुस्तीत सेनादलचा सोनबा गोंगाणे व राष्ट्रीय पदक विजेता परमानंद इंगळगी ही कुस्ती मध्यवर्ती कुस्तीगिर संघटनेच्यावतीने लावण्यात आली. या कुस्तीत दुसऱ्या मिनिटाला सोनबा गोंगाणेने पायाला चाट मारुन परमानंदला खाली घेत पायाला आकडी लावून चीत करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण परमानंदने त्यातून सुटका करुन घेतली. ही कुस्ती डाव प्रतीडावाने झुंजली पण वेळे अभावी ही कुस्ती बरोबरीत राहिली. चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत पवन चिकदीनकोप भांदुर गल्ली व दयानंद घटप्रभा या कुस्तीत पवनने दयानंदला पाय लावून घीस्सा डावावर पराभूत केले.
पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत संतोष हरुगीरीने पार्थ पाटीलला एकचाक मारुन खाली घेत चीत करण्याचा प्रयत्न केला. पण पार्थ पाटीलने खालून पुट्टी मारुन संतोषवर कब्जा करताना संतोष जखमी झाल्याने पार्थला विजयी घोषित करण्यात आले. सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत यल्लाप्पा निर्वानट्टीने महेश तिर्थकुंडेला सवारी डावावर चीत केले. सातव्या क्रमांकाची कुस्ती अजित गोडगेरी व हणमंत गडीगवाड ही कुस्ती बरोबरीत राहिली. आठव्या क्रमांकाच्या कुस्तीत बाळू शिंदीकुरबेटने परशराम हरिहरला घीस्सा डावावर पराभूत केले. नवव्या क्रमांकाच्या कुस्तीत सचिन शिंदेट्टीने हणमंत घटप्रभाचा हप्ते डावावरती विजय मिळविला. दहाव्या क्रमांकाची कुस्ती सचिन लंगोटी व रुद्राप्पा ही कुस्ती बरोबरीत राहिली. आकर्षक कुस्तीत रोहित पाटील कंग्राळीने मुत्तूराज धारवाडचा अवघ्या दीड मिनिटात दोन्ही हाताचे हप्ते भरुन मुत्तूराजला चीत करत गदेचा मानकरी ठरला. दुसऱ्या कुस्तीत रुपेश कर्लेने पांडुरंगचा एकचाक डावावरती विजय मिळविला. तिसऱ्या कुस्तीत ओम घाडीने सलील पठाण रणकुंडेचा मोळी डावावरती पराभव केला. चौथ्या कुस्तीत प्रज्वल मच्छेने वेदांत मासेकरवर आतील टांग डावावर चीत केले. इतर कुस्तीत वैष्णव गुरव किणये, ओमकार सांगाव, श्री घाडी धारवाड, तुकाराम डुकरे, भुमीपूत्र चौगुले मुतगा, वैभव अलारवाड, पवन मुतगा, विकास चापगाव, समर्थ डुकरे आदी मल्लांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.
महिलांच्या प्रमुख कुस्तीत ऋतुजा रावळ शहापूर हिने पूर्वा आंबेवाडीचा घीस्सा डावावर पराभव करुन गदेची मानकरी ठरली. दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत राजश्री नाईकने कल्याणी आंबोळकरचा एकचाक डावावरती पराभव केला. त्याचप्रमाणे सिद्धी निलजकर कंग्राळी, आदीती कोरे शहापूर, भक्ती गावडा खानापूर, प्रभा शिवणगेकर खादरवाडी, जान्हवी पाटील किणये, मनस्वी जायाण्णाचे मजगाव, शितल सुतार खादरवाडी, आराध्या हलगेकर येळ्ळूर, समिक्षा उशिणकर खानापूर, मिथिला बिर्जे अनगोळ यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन विजय मिळवला. आखाड्याचे पंच म्हणून कृष्णा पाटील, बळाराम पाटील, ए. जी. मंथुरगे, सुधीर बिर्जे, शिवाजी पाटील, बस्सू घोडगेरी, पिराजी मुचंडीकर, बबन येळ्ळूर, राजू कडोली, दुंडाप्पा, अतुल शिरोळे आदींनी काम पाहिले. कुस्तीचे समालोचन कृष्णा चौगुले राशिवडे, सुहास मुचंडीकर पिरनवाडी यांनी काम पाहिले.









