रत्नागिरी, प्रतिनिधी
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात १ लाख १८ हजार ४२२ कोटींची परदेशी गुंतवणूक राज्यातील उद्योगांमध्ये झाली असून,यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे.एमआयडीसीच्या पुढील वर्धापन दिनापर्यंत १० हजार कोटींचा प्रकल्प रत्नागिरीत असेल, अशी अपेक्षा पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. एमआयडीसीच्या ६१ व्या वर्धापन दिन सोहळयात पालकमंत्री सामंत बोलत होते.
ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात १ लाख १८ हजार ४२२ कोटींची परदेशी गुंतवणूक आणू शकलो यात एमआयडीसीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे. दावस येथे झालेल्या सामंजस्य करारापैकी १ लाख ६ हजार उद्योगांना जागा दिली आहे. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना त्याबाबत धन्यवाद देतो.निश्चितच ते सत्काराला पात्र आहेत.
सर्वसामान्य माणसाला त्रास होता कामा नये,हे एमआयडीसीने जपलय.मानसिकता असेल तर काय किमया होऊ शकते,हे एमआयडीसीने दाखवून दिले आहे.स्थानिकांना प्राधान्याने काम दिलं पाहिजे, त्यांना जगवलं पाहिजे, त्या घटकाला वंचित ठेवू नये,अशी भूमिका उद्योजकांनी घेतली पाहिजे.इथून पुढेही एमआयडीसीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शांतपणे व तन्मयतेने काम करावं, असे मार्गदर्शनही पालकमंत्री सामंत यांनी केले. यावेळी शैक्षणिक परीक्षेत उत्तम गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात शिवमूर्तीच्या पुजनाने आणि दीपप्रज्ज्वलनाने झाली.प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे यांनी कार्यक्रमाचे स्वागत,प्रास्ताविक केले.तसेच कार्यकारी अभियंता सचिन राक्षे यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उपअभियंता बी.एन.पाटील, माजी जि.प.सदस्य महेश उर्फ बाबू म्हाप,माजी नगराध्यक्ष राहूल पंडित,उद्योजक संस्थेचे प्रतिनिधी के.बी.भट,राजेंद्र सावंत,दिगंबर मगदूम आदी उपस्थित होते.