राज-उद्धव ठाकरेंची युती तर होऊ द्या, उदय सामंतांनी थेटच सांगितलं..
चिपळूण: ठाकरे बंधू एकत्र आल्यास सरकारला धोका होईल का? या पत्रकारांच्या प्रश्नावर पालकमंत्री उदय सामंत यांनी आधी त्यांची युती तर होऊ द्या, अशी खोचक प्रतिक्रिया दिली. युतीची जास्त घाई ‘उबाठा’लाच आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यांची युती काहीजण होऊन देतील का, असा प्रश्नही त्यांनी पत्रकारांना विचारला.
इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रातील पत्रकार परीषदेत ते बोलत होते, यावेळी ते पुढे म्हणाले की, ठाकरे बंधू एकत्र आले तर राजकारणाचे काय होईल, असा प्रश्न पडला आहे. मात्र असे असले तरी माझा जर-तर वर विश्वास नाही. त्यामुळे जी गोष्ट अजून घडलीच नाही, त्याबाबत प्रतिक्रिया देणे योग्य नाही.
मनसेबरोबर युती करण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. मात्र ‘उबाठा’लाच मनसेबरोबरच्या युतीची घाई लागली आहे. ती का, हे सर्वांनाच माहित आहे. मात्र त्यांच्या घाईपेक्षा राज ठाकरे यांची भूमिका महत्वाची ठरणार असून युतीबाबत त्यांनी अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
त्याही पुढे काहीजण त्यांना युती करून देतील का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, शहरप्रमुख उमेश सकपाळ, युवा सेना तालुकाप्रमुख निहार कोवळे आदी उपस्थित होते.








