Uday Samant Car Attack : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला आता हिंसक वळण लागले आहे. काल शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात शिवसैनिकांनी हल्ला केला. यानंतर शिंदे गटातील नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. तसेच हा हल्ला पूर्वनियोजीत होता अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे. काल हल्ला झाल्य़ानंतर त्यांनी कात्रज पोलिस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा नोंद केला. तसेच तानाजी सावंत आणि मला जीवे मारण्याचा सेनेचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, आज या घटनेनंतर शिंदे गटाची काय भूमिका आहे हे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.
उदय सामंत म्हणाले, लोकशाहीमध्ये एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी उठाव करण्याने अशा पध्दतीने हल्ला होत असेल तर हे महाराष्ट्रासाठी दुर्देवाची गोष्ट आहे. एखादा विचार बदलल्याने त्याचे परिणाम काय होतात हे आता जनतोला कळाले आहे. मी स्वत: शांत आहे हे माझ्यावरील संस्कार आहेत. याबाबत मी ट्विट देखील केले आहे. हल्ला म्हणजे उत्स्फुर्त प्रतिक्रिया अस म्हणाणाऱ्या देसाईंची कीव येतेय. माझ्या कार्यकर्त्यांनी असा प्रकार केला असता तर मी त्यांना पोलिसांच्या हवाले केले असते.
उध्दव ठाकरे मुलाखतीत म्हणतात राजकारण हे आरोग्यदायी असावं. पण काल ज्या पध्दतीने हल्ला झाला यामुळे आरोग्य बिघडेल. मी त्या १०० ते १५० लोकांना नावं नाही ठेवणार. काल जे आक्रमक भाषण झाल त्यानंतर शिवसैनिक आक्रमक होणारचं. राजकारण किती खालच्या थराला गेलं आहे हे कालच उदाहरण आहे.
महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाणीवपूर्वक संभ्रम करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप त्यांनी शिवसेनेवर केला. विचार पटला नाही म्हणून ठार मारणं हा काही लोकशाहीचा स्तंभ नाही असेही ते म्हणाले.
कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणात सांगितले आहे की, आपल्याला जर शिवीगाळ केली, टीका केली तर त्यांना विकासाचे काम करून उत्तर द्या. कुठेही कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची नाही हा विचार एकीकडे होत असताना काल संध्याकाळी हल्ला केला गेला. या हल्यावेळी उदय सावंतला मारलं आता तानाजी सावंत याला मारायचं असं बोललं जात होत. हे लोकशाहीला घातक असल्य़ाचेही त्यांनी म्हटले.
हेही वाचा- आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका, उदय सामंत समर्थकांचा इशारा
दैव बलवत्तर म्हणून मी वाचलो. नाहीतर माझ्या आई-वडिलांकडून प्रतिक्रिया घ्यावी लागली असती. मी सांगितल्यानंतर मारहाण होऊ शकते ही वाईट प्रवृत्ती आहे. काल या प्रवृत्तीचं दर्शन झालं. काल अर्वाच्च भाषेत शिवीगाळ सुरु होती. विचार पटला नाही म्हणजे हल्ला करणं ही लोकशाही नाही. सोज्वळ चेहऱ्यामागे काय प्रकार चालतात हे काल कळलं. ठाकरेंसोबतच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया संभ्रम निर्माण करणाऱ्या आहेत.
आम्ही शांत आहोत याचा अर्थ असहाय्य नाही.आम्ही हतबल नाही. राजकारणाची लढाई विचारांची असली पाहिजे. एखाद्याने वाईट विचार मांडला तर चांगला विचार मांडून त्यांनी प्रतिक्रिया दिली पाहिजे. शिवसेना स्टाईल म्हणजे मारहाण असते का? जे तुरुंगात जातील त्यांना सोडवायला कोण जाणार? नारायण राणेंना नाव ठेवण्याचा यांना काय अधिकार? असा सवाल त्यांनी यावेळी केला. मारहाण करण्यापेक्षा संयम राखण्याचं आवाहन का होत नाही? दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत. सेनेतील नेत्यांनी तोडण्यापेक्षा जोडायला हवं होत. एकदा तोडल्यावर परत का आरोप करताय.येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील जनताचं उत्तर देईल असे स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिलं.
Previous Articleमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर उद्या सुनावणी
Next Article Satara; जोरदार शिव्यांच्या भडिमारात रंगला बोरीचा बार








