देवरुखात 1 कोटीचा निधी खर्च करून शिवरायांचा पुतळा उभारण्यात येणार
देवरुख : कोकण ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. शिवराय म्हणजे प्रेरणास्थान. आपल्याला लाभलेला ऐतिहासिक वारसा जपणे हेदेखील आपले काम व जबाबदारी आहे. देवरुख शहरात 1 कोटीचा निधी खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी वांझोळे येथील कार्यक्रमाप्रसंगी केली.
देवरुख शहरातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी वांझोळे–बावनदी पुलावर पालकमंत्री सामंत यांच्या पुढाकाराने नगर परिषदांना वैशिष्ट्यापूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेंतर्गत कोल्हापूर पद्धतीचा बंधारा उभारण्यासाठी 7 कोटी 51 लाख 22 हजार 767 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या विकासकामाचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्र्यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करून, श्रीफळ वाढवून शनिवारी संपन्न झाला.
याप्रसंगी सामंत म्हणाले, जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच आपले स्वप्न आहे. पाणी समस्येला महिला वर्गाला जास्त सामोरे जावे लागते. देवरुखवासियांना पाण्याची कमतरता भासू नये, या उद्देशाने बंधारा उभारणीसाठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध आहे. विकासकाम हे चांगल्या दर्जाचे होणे गरजेचे असून याकडे अधिकारी वर्गाने बारकाईने लक्ष द्यावे. उपलब्ध पाण्याचा योग्य विनियोग करणे हे नागरिकांचे काम आहे.
नगर पंचायतींचे मुख्याधिकारी जनतेशी समरस होवून काम करत असल्याचा उल्लेख देखील सामंत यांनी केला. अमली पदार्थांच्या सेवनामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्यांवर व पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. अमली पदार्थाचे उच्चाटन झाले पाहिजे. पोलीस यंत्रणेने थेट कारवाईचा बडगा उगारावा, पालकमंत्री म्हणून मी तुमच्या सदैव पाठीशी आहे. तीन महिन्यात रत्नागिरी जिल्हा अमली पदार्थमुक्त म्हणून घोषित व्हावा, हे आपले स्वप्न आहे यासाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे.
महिलांचे आरोग्य चांगले रहाणेही गरजेचे आहे. यासाठी 6 कोटी रुपये खर्चून रत्नागिरी जिल्ह्यातील 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना कॅन्सर प्रतिबंधक लस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रतिबंधक लस देणारा रत्नागिरी हा पहिला जिल्हा आहे. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. याला जनतेने सहकार्य करावे, अशी साद सामंत यांनी घातली.
व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, जि. प. माजी अध्यक्ष रोहन बने, माजी बांधकाम सभापती बाबू म्हाप, वांझोळे गावचे सरपंच निधी पंदेरे, मुरादपूर गावच्या सरपंच दिक्षा बांडागळे, तहसीलदार अमृता साबळे, अभिजित शेट्यो, मृणाल शेट्यो, बाबा सावंत, प्रसाद सावंत, सचिन मांगले, प्रफुल्ल भुवड, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश सलगर, अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, देवरूख न. पं.चे मुख्याधिकारी चेतन विसपुते यांसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच देवरुख, वांझोळे, मुरादपूर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
18 महिन्यात बंधारा पूर्णत्वास
मुख्याधिकारी चेतन विसपुते यांनी प्रास्ताविक करताना 18 महिन्यात या बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास जाईल. यानंतर तमाम देवरुखवसियांना 24 तास पाणी मिळेल. या बंधाऱ्यासाठी 7 कोटीचा निधी पालकमंत्र्यांमुळे प्राप्त झाल्याचे नमूद केले. अभिजीत शेट्यो यांनी तत्कालीन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांनी देवरुखवासियांना मुबलक पाणी मिळावे, असे स्वप्न पाहिले होते. यासाठी अशाप्रकारे पाठपुरावा करण्यात आला, ते नमूद केले. धरण उभारणीमुळे ते स्वप्न पूर्णत्वास जाणार असल्याबाबत समाधान व्यक्त केले.
देवरुखवर आपल्या विचारांची सत्ता
देवरुख शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण राजकारण न करता कोट्यावधी निधी दिला. विकासकामे कोणी केली, हे जनतेला कळणे गरजेचे आहे. महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ही विकासकामे जनतेला सांगावीत. भविष्यात प्रचार करण्याची गरज भासणार नाही. देवरुख नगर पंचायतीवर आपल्या विचारांची सत्ता आली पाहिजे, याचा उल्लेख मंत्री उदय सामंत यांनी आवर्जून केला.








