23 व्या संमेलनाचे चार सत्रात आयोजन : स्वागतासाठी उचगाव सज्ज
वार्ताहर/ उचगाव
विठ्ठल भक्तीच्या ओढीने वारकरी दरवषी ज्या उत्कट भावनेने पंढरीची वारी करतात त्याच भावनेने उचगाव येथे उचगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित 23 व्या मराठी साहित्य संमेलनासाठी रसिक, वारकरी आवर्जून येतात. त्यांच्या स्वागतासाठी उचगावनगरी सज्ज झाली असून साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे. गावात उत्साहाचे वातावरण असून, उचगावच्या मध्यवर्ती गणेश, विठ्ठल-रखुमाईच्या प्रांगणातील गांधी चौकामध्ये संमेलनस्थळी भव्य कै. लक्ष्मण शट्टूप्पा होनगेकर शामियाना उभारण्यात आला आहे. ग्रंथदिंडी मार्गावर अनेक ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत.
सीमाभागातील मराठी भाषेचे संवर्धन करणे, साहित्यिक निर्माण करणे तसेच मराठी साहित्याचा प्रसार व्हावा या हेतूने उचगाव परिसरातील मराठी भाषिक गेली 22 वर्षे संमेलनाच्या माध्यमातून कार्यरत आहेत. संमेलनासाठी महाराष्ट्रातून दिग्गज साहित्यिक आणि बेळगाव, निपाणी, चंदगड, खानापूर तालुक्यांतून साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. संमेलनासाठी लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे संस्थापक चेअरमन आणि तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर, चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील यांची खास उपस्थिती राहणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मणराव होनगेकर उपस्थित राहणार आहेत. सकाळी ठीक 9.30 वाजता गांधी चौकातून ग्रंथदिंडीचा शुभारंभ होणार आहे. यामध्ये वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, ढोल, ताशा, झांज पथक, लेझीम तसेच परिसरातील शाळांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, उचगाव पंचक्रोशीतील आजी-माजी सैनिक संघटनेचे सैनिक वेशभूषेमध्ये सामील होणार आहेत. ही ग्रंथदिंडी गणपती गल्लीमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कचेरी गल्लीतून संमेलनस्थळी येणार आहे.
यानंतर गणेश पूजन अॅड. सुधीर चव्हाण यांच्या हस्ते, विठ्ठल ऊखुमाई पूजन बाळकृष्ण तेरसे व मथुरा तेरसे यांच्या हस्ते, श्रीराम पूजन तुकाराम पाटील यांच्या हस्ते, पालखी पूजन प्रकाश मरगाळे, ग्रंथदिंडी पूजन आर. के. पाटील, ग्रंथदिंडी उद्घाटन एसएसएलसी 1982 बॅच स्वामी विवेकानंद हायस्कूल यांच्या हस्ते, ग्रंथदिंडी मिरवणूक शुभारंभ माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते, छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन आर. एम. चौगुले, पुस्तक प्रदर्शन उद्घाटन दीपक नवार, मळेकरणी देवीचे पूजन बी. एस. होनगेकर, सभा मंडपाचे उद्घाटन मल्लव्वा बाडीवाले, व्यासपीठाचे उद्घाटन किशोर पोटजाळे, सरस्वती फोटो पूजन मदन बामणे, ज्ञानेश्वर फोटो पूजन नागेश तरळे, आणि संमेलनाचे उद्घाटन द. म. शि. मंडळाचे खजिनदार एन. बी. खांडेकर यांच्या हस्ते होणार आहे.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत, सत्कार समारंभानंतर सकाळी 11 वाजता बाबासाहेब सौदागर यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे. दुपारी 12.15 ते 1.45 पर्यंत संत साहित्यावर हभप माऊली महाराज जाहुरकर या बाल प्रवचनकारांचे प्रवचन संत साहित्यावर होणार आहे. 1.45 ते 2.15 सर्वांना गोड भोजनाचा आनंद लुटायचा आहे.
यानंतर तिसऱ्या सत्रात हास्य कवी दुर्गेश सोनार आणि आनंद राऊत यांचे कवी संमेलन होईल. शेवटच्या चौथ्या सत्रात गोविंद महाराज गायकवाड यांचे विनोदी भाऊड सादर होणार आहे. संमेलनाला सर्वांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन अकादमीने केले आहे.









