यंदा प्रथमच गोड नैवेद्य : भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन : महाआरतीला उपस्थित राहण्याचे आवाहन
वार्ताहर/उचगाव
उचगाव येथील जागृत मळेकरणी देवीच्या उत्सवाचा सांगता समारंभ बुधवार दि. 19 मार्च रोजी महाप्रसादाने होणार आहे. या सप्ताहाचे खास वैशिष्ट्या म्हणजे गेली 104 वर्षे मांसाहारी महाप्रसादाने सांगता होत असे. मात्र यावर्षी खीर बुंदीच्या गोड महाप्रसादाने सांगता होणार आहे. या महाप्रसादाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे उचगाव मळेकरणीदेवी सार्वजनिक सप्ताह उत्सव कमिटीने कळविले आहे. शुक्रवार दि. 14 मार्चपासून या उत्सवाला मोठ्या धार्मिक आणि उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. शुक्रवारी सायंकाळी खानापूर येथील भाऊडी भजनाचा कार्यक्रम पार पाडला. शनिवारी राधानगरी कोल्हापूर येथील ‘माय मराठी जागर’ हा नाट्याप्रयोग लक्षवेधी ठरला. या नाट्याप्रयोगाला जवळपास पाच ते सहा हजार भाविकांनी उपस्थिती लावून या नाटकाचा आनंद लुटला. रविवार दि. 16 रोजी पंत महाराज बाळेकुंद्री तसेच उचगाव, कालकुंद्री, निट्टूर, कौलगे या गावातील महिला भजनी मंडळांनी आपापले कार्यक्रम सादर केले. सोमवार दि. 17 रोजी शुभम साई प्रेझेंट्स कोल्हापूर आयोजित ‘सारेगमप’ हा व नाट्याप्रयोग सादर केला.
बुधवारी रंगपंचमी
बुधवारी सकाळी आठ ते अकरा या वेळेत गावामध्ये रंगपंचमी असेल. रंगपंचमीनंतर दुपारी बारा ते चार या वेळेतच महाप्रसाद होणार आहे. दुपारी चार वाजता मळेकरणी देवीचा पालखी सोहळा गावामध्ये होणार आहे. उचगाव पंचक्रोशीतील तसेच महाप्रसादासाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी दुपारी बारा ते चार या वेळेतच उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे मळेकरणीदेवी सप्ताह उत्सव कमिटीने कळविले आहे. नागरिकांनी सकाळी आणि सायंकाळी होणाऱ्या महाआरतीला उपस्थिती लावली होती. विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी आपल्या पत्नीसह उपस्थित राहून आरतीचा लाभ घेतला.









