सकाळी भूमिपूजन सायंकाळपर्यंत बसस्थानक पूर्ण
वार्ताहर/ उचगाव
उचगाव ग्रामपंचायतीने अनेक कामे विचारपूर्वक हाती घेतली आणि फत्ते केली. यामुळे ग्रामस्थांच्या अभिनंदनला पंचायत पात्र ठरली. वाद्ग्रस्त, कठीण कामे अवाक्याबाहेर असतानाही योग्य बुद्धीचा आणि सहनशीलता वापरून केल्याने ती यशस्वी होतात हेच त्यांनी उचगाव बसस्थानक उभारण्याचा संकल्प केला आणि सकाळी भूमिपूजन सायंकाळपर्यंत बसस्थानक पूर्ण हे करून दाखवले.
उचगाव छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये काही जागेवरती, काही संघटनांनी विनाकारण तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला होता. यामुळे गावात तणाव आणि अशांतता निर्माण झाली होती. यावर सर्वेसर्वा उपाय म्हणून ज्या ठिकाणी ज्याची नितांत गरज आहे. अशा ठिकाणी उचगाव बसस्थानक उभारण्याचा संकल्प केला.
उचगाव बसस्थानक हे या भागातील एक प्रमुख केंद्र बिंदू म्हणून ओळखले जाते. जवळपासच्या अनेक गावातील नागरिक व प्रवाशांची या बस स्थानकावरून बेळगावला ये-जा सुरू असते. सध्या असलेले बसस्थानक अपुरे पडत असल्याने जादा बसस्थानकाची आवश्यकता भासत असल्याने सदर जागेत बसस्थानक उभारण्याचा संकल्प केला आणि तातडीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून, ध्वजवंदन कार्यक्रमानंतर लागलीच ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन मोठ्या संख्येने सकाळी अकराच्या सुमाराला भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.
सदर भूमिपूजन या भागातील एक लोकप्रिय नेते ग्रामपंचायत माजी सदस्य बी. एस. होनगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर मार्केट यार्डमधील अडत व्यापारी पी. एल. कदम यांच्या हस्ते पहिली कुदळ मारून या बसस्थानकाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्षा मथुरा तेरसे या होत्या. यावेळी उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी मडिवाळ आणि सर्व सदस्य उपस्थित होते. या सर्वांच्याच उपस्थितीत भूमिपूजन आणि या कामाचा श्रीफळ वाढविण्यात आला. यानंतर लागलीच या बसस्थानक उभारण्याचा कामाला प्रारंभ करण्यात आला. रात्री बारा वाजेपर्यंत हे काम पूर्णत्वाला नेले.
याप्रसंगी बंटी पावशे, संभाजी कदम, रामा कदम, अशोक हुक्केरीकर, मधु जाधव, बाळासाहेब देसाई, सुनील देसाई, अंकुश पाटील, यादो कांबळे, दत्ता बेनके, भारती जाधव, स्मिता खांडेकर, माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन एन. ओ. चौगुले यांनी तर आभार एल.डी. चौगुले यांनी मानले.