कोल्हापूर :
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे निधन झाल्याने अधिवेशनाचे कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अधिवेशनाला आलेले दोन माजी मंत्री, चार आमदार, न्यायाधीश आणि शासकीय कर्मचारी बुधवारी करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरला आले होते. दर्शन घेतल्यानंतर ते अंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाज्यात आल्यानंतर उबाठा शिवसेनेचे उपनेते संजय पवार आणि सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी कर्नाटकात मराठी भाषिकांना त्रास दिला जात असल्याबद्दल जाब विचारला. यावेळी आम्ही विरोधक असून, सभागृहात मराठी भाषिकांचे प्रश्न निश्चितपणे मांडू अशी ग्वाही दिल्यानंतर त्यांना शिवसैनिकांनी सोडले.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने बेळगावमध्ये महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक दोन दिवसांपूर्वी बेळगावला जात असताना कर्नाटक–महाराष्ट्राच्या सीमेवर त्यांना पोलीसांनी रोखले. त्यामुळे कोल्हापुरात आलेले माजी मंत्री आणि आमदारांना शिवसैनिकांनी आडवून शांततेत जाब विचारला. कर्नाटक हे राज्य भारत देशातीलच एक असून सर्वत्र लोकशाही आहे. तरीही मराठी भाषिकांची आडवणूक करून कर्नाटक सरकार लोकशाहीचा आपमान करत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच कर्नाटकातील राजकीय नेते, लोकप्रतिनिधी अथवा सर्वसामान्य नागरीक ज्यावेळी महाराष्ट्रातील अन्य जिह्यांसह कोल्हापुरात येतात तेंव्हा त्यांना महाराष्ट्र सरकारकडून कधीही आडवले जात नाही. मग कर्नाटकात मराठी भाषिकांवर एवढा अन्याय आणि गळचेपी कशासाठी ? असा सवाल शिवसैनिकांनी कर्नाटकातील लोकप्रतिनिधीसमोर उपस्थित करून परखडपणे जाब विचारला.
यावेळी आम्ही विरोधी पक्षाचे माजी मंत्री व आमदार आहोत. तरीही मराठी भाषिकांच्या महामेळाव्यास का विरोध केला ? असा प्रश्न आम्ही कर्नाटक विधानसभेच्या सभागृहात उपस्थित करू, अशी ग्वाही त्यांनी संजय पवार व विजय देवणे यांना दिली. या आश्वासनानंतर शिवसैनिकांनी त्यांना सोडल्यानंतर ते कर्नाटककडे रवाना झाले. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








