पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत घेतला सहभाग, सोहळ्याचा शानदार प्रारंभ
वृत्तसंस्था / गांधीनगर
‘व्हायब्रंट गुजरात’ या प्रतिवर्ष आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य सोहळ्याला यंदाही शानदार प्रारंभ करण्यात आला आहे. गुजरातमध्ये आणि देशात मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक यावी या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात येतो. यावेळी यात भाग घेण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष मोहम्मद बिन जायद अल नहयान हे आलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वत: उपस्थित राहून विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी 3 किलोमीटर लांबीचा रोड शो केला. या रोड शोला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
हा सोहळा गुजरातमधील प्रमुख औद्योगिक शहर अहमदाबाद येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या व्हायब्रंट गुजरात वैश्विक शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी अनेक देशांचे मोठे नेते अहमदाबाद येथे आले आहेत. या कार्यक्रमात विदेशी गुंतवणुकीचे अनेक करार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा सोहळा 8 जानेवारी ते 10 जानेवारी असा तीन दिवस आहे. त्याचा औपचारिक प्रारंभ सोमवारी करण्यात आला. मात्र, खऱ्या अर्थाने कार्यक्रमाचा आरंभ मंगळवारी रोडशोने करण्यात आला आहे.
अनेकांच्या भेटीगाठी होणार
या कार्यक्रमात अनेक बडे नेते उपस्थित असल्याने त्यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाठीभेटी होणार आहेत. भारतात गुंतवणुकीसाठी वातावरण गेल्या 10 वर्षांमध्ये कसे अधिकाधिक अनुकूल होत गेले आहे, हे भारत जागतिक नेत्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. भारताच्या विकासदर जगात सर्वाधिक आहे, हे आता जागतिक वित्त आणि सर्वेक्षण संस्थांनीही मान्य केले आहे. त्यामुळे भारताकडे गुंतवणुकीचे प्रमुख आकर्षण म्हणून पाहिले जात आहे.
महात्मा मंदीर केंद्रात चर्चा
मंगळवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा मंदीर केंद्रात जगातील महत्वाच्या नेत्यांशी चर्चा केली. ही चर्चा द्विपक्षीय संबंध आणि गुंतवणूक तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान यासंबंधी होती. केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षांमध्ये गुंतवणुकीला अनुकूल असे धोरण ठेवले. एकीकडे देशाच्या आर्थिक विकासाचा लाभ तळागाळातील लोकांना पोहचवितानाच दुसरीकडे देशात संपत्तीचे निर्माण व्हावे आणि देश विकसनशीलत्वाची मर्यादा ओलांडून विकसीतेकडे जावा, यासाठीही सरकारने मोठे प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नांची फळे आता मिळताना दिसू लागली आहेत. या परिवर्तनाचे प्रतिबिंब या सोहळ्यातही पडलेले आहे.
व्यापार मेळ्याचे उद्घाटन
दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कार्यक्रम स्थळी वैश्विक व्यापार मेळ्याचे उद्घाटन केले. या मेळाव्यात त्यांनी विविध औद्योगिक नेत्यांची चर्चाही केली. या शोमध्ये जागतिक व्यापारासंबंधी अनेक स्टॉल्स स्थापन करण्यात आले असून त्यातून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि त्या क्षेत्रात चाललेल्या प्रगतीची कल्पना येते. वैश्विक औद्योगिक नेत्यांशी चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची प्रगती आणि उज्ज्वल भविष्यकाळ यांची माहीती त्यांना दिली.
पुढचा भाग गांधीनगरमध्ये
अहमदाबादचे या कार्यक्रमाचे संस्करण 10 जानेवारीला संपणार असले तरी 12 जानेवारीपर्यंत याच कार्यक्रमाचा पुढचा भाग गुजरातची राजधानी गांधीनगर येथे होणार आहे. गांधीनगरमधील कार्यक्रमात 34 देशांचे नेते आणि औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर भाग घेणार असून गुंतवणुकीसंबंधी करार याच भागात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 34 देशांसमवेत 16 औद्योगिक संघटनाही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.









