भारत-मध्यपूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरचा नकाशा जारी : अरब देशाचा भारताला पाठिंबा
वृत्तसंस्था/ दुबई
जी-20 परिषद समाप्त झाल्यावर संयुक्त अरब अमिरातचे उपपंतप्रधान सैफ बिन जायद अल नाहयान यांनी शिखर परिषदेचा एक व्हिडिओ शेअर केला असून यात भारत-मध्यपूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरशी (आयएमईसी) संबंधित एक नकाशा दिसून येत आहे. या नकाशात युएईने पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा हिस्सा असल्याचे दर्शविले आहे.
या व्हिडिओत अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन हे युएई नसता तर आज आम्ही आयएमईसी प्रकल्पाच्या घोषणेपर्यंत पोहोचू शकलो नसतो असे वक्तव्य करताना दिसून येतात. हे राजनयिक पाऊल भारतासोबतचे युएईचे मजबूत संबंध दर्शवितात. तसेच हे भारताच्या सार्वभौमत्वाला देखील मजबूत करत असल्याचे नाहयान यांनी म्हटले आहे.
यापूर्वी मार्च महिन्यात दुबईतील सर्वात मोठा रियल इस्टेट डेव्हलपर एम्मार समुहाने श्रीनगरमध्ये एका मॉल प्रकल्पाचा शुभारंभ केला होता. 10 लाख चौरस फुटांमध्ये तयार होणारा हा मॉल काश्मीरमधून कलम 370 हटविण्यात आल्यानंतरचा पहिला विदेशी प्रकल्प आहे.
युएईकडून भारताचे समर्थन
युएई या अरब देशाचे पाकिस्तानशी देखील घनिष्ठ संबंध आहेत. आर्थिक संकटाला तोंड देणाऱ्या पाकिस्तानला युएईने 1 अब्ज डॉलर्सची मदत केली होती. पाकिस्तानशी चांगले संबंध असूनही युएईने काश्मीरसंबंधी भारताच्या विरोधात कधीच टिप्पणी केलेली नाही. 2019 मध्ये भारताने काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 हद्दपार केल्यावर युएईने याला भारताचा अंतर्गत विषय ठरविले होते. तर दुसरीकडे पाकिस्तान भारताच्या या कृतीविरोधात अरब देशांकडून कठोर प्रतिक्रियेची आस बाळगून होता.
भारत-पाक संबंध सुधारावेत
पुलवामा येथील दहशतवादी हल्ला आणि जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आणल्यावर भारत आणि पाकिस्तानचे संबंध अत्यंत बिघडले होते. त्यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कलम 370 पुन्हा लागू होत नाही तोवर भारताशी कुठल्याही प्रकारची चर्चा करणार नसल्याची घोषणा केली होती. तर दहशतवाद रोखला जात नाही तोवर चर्चेचा प्रश्नच उद्भवत नसल्याची भूमिका भारताने मांडली होती. यानंतर 2 वर्षांनीच 25 फेब्रुवारी 2021 रोजी भारत-पाकिस्तान दरम्यान सीमेवर शस्त्रसंधीची घोषणा झाली होती. दोन्ही देशांदरम्यान डीजीएमओ स्तरीय चर्चेनंतर ही सहमती झाली होती. संयुक्त अरब अमिरातने ही चर्चा घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. या शस्त्रसंधीच्या घोषणेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 26 फेब्रुवारी 2021 रोजी युएईचे विदेशमंत्री अब्दुल्ला बिन जायद अल नाहयान हे अचानक दिल्लीच्या एक दिवसीय दौऱ्यावर पोहोचले होते.









