वृत्तसंस्था/ पुणे
बालेवाडी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू झालेल्या नवव्या प्रो कबड्डी लिग स्पर्धेच्या दुसऱया टप्प्यात शनिवारी झालेल्या सामन्यामध्ये यु मुम्बा संघाने बंगाल वॉरियर्सचा तर पाटणा पायरेटस्ने युपी योद्धाज संघाचा पराभव केला.
रिंकू, आशीष आणि मोहित यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर यु मुम्बा संघाने बंगाल वॉरियर्सचा 36-25 अशा 11 गुणांच्या फरकाने दणदणीत पराभव केला. या सामन्यात मध्यंतरापर्यंत यु मुम्बा संघाने बंगाल वॉरियर्सवर 21-13 अशी आघाडी घेतली होती. सामन्याच्या उत्तरार्धात बंगाल वॉरियर्सने कडवी लढत देण्याचा प्रयत्न केला. बंगाल वॉरियर्स संघातील श्रीकांत जाधवच्या शानदार चढाईमुळे बंगाल वॉरियर्सने यु मुम्बाची आघाडी 5 गुणांनी कमी केली. पण यु मुम्बाच्या शानदार आणि आक्रमक चढायामुळे बंगाल वॉरियर्सला हा सामना गमवावा लागला. यु मुम्बा संघातील जे भगवान आणि सुरिंदर यांची कामगिरीही दर्जेदार झाली.
शनिवारी झालेल्या दुसऱया एका सामन्यात पाटणा पायरेटस्ने युपी योद्धाज संघाचा 34-29 अशा पाच गुणांच्या फरकाने पराभव केला. पाटणा पारेटस संघातील हुकमी रायडर प्रदीप नरवालने सुपर 10 नोंदविले. चालू प्रो कबड्डी लिग हंगामात नरवालने तिसऱयांदा सुपर 10 नोंदवले आहेत. पाटणा पायरेट संघातील प्रदीप नरवालने 12, रोहित तोमरने 5, सुरिंदर गिलने 4 गुण नोंदवले आहेत. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात पाटणा पायरेटस्ने आठवे स्थान मिळवताना सात सामन्यातून 19 गुण घेतले आहेत. या सामन्यात पाटणा पायरेट्सला एक गुण मिळाला. आता या स्पर्धेत युपी योद्धाजचा पुढील सामना तेलगू टायटन्स बरोबर सोमवारी खेळविला जाणार आहे.









