वृत्तसंस्था / अहमदाबाद
येथे सुरू असलेल्या अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धेत यू मुम्बा संघाने दबंग दिल्लीचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. सहाव्या अल्टिमेट टेबल टेनिस हंगामात (यूटीटी) यू मुम्बाने आतापर्यंत दर्जेदार खेळ करत दबंग दिल्लीची विजयी घोडदौड या लढतीत रोखली. या सामन्यात यू मुम्बाने दबंग दिल्लीचा 10-5 असा पराभव केला.
या स्पर्धेच्या लीग टप्प्याअखेर गुणतक्त्यात दबंग दिल्लीने 44 गुणासह आघाडीचे स्थान मिळविले आहे. अहमदाबादमधील झालेल्या विमान दुर्घटनेतील मृतांना सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडूंनी दंडाला काळ्याफिती बांधत दोन मिनिटे मौन पाळत आदरांजली वाहिली.
यू मुम्बा आणि दबंग दिल्ली यांच्यातील या लढतीमध्ये लिलीयान बार्डेटने जी साथीयानचा 2-1 असा पराभव करुन यू मुम्बाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात झोक्सने दीया चितळेवर 2-1 अशी मात केली. मिश्र दुहेरीच्या सामन्यात झोक्स आणि आकाश पाल यांनी क्वेक आणि दीया चितळे यांचा पराभव करत यु मुम्बा संघाला उपांत्य फेरीत नेले. त्यानंतर या लढतीत दिल्लीने उर्वरित दोन लढती जिंकल्या. पण अभीनंदनने आणखी दोन गुण घेत यू मुम्बाच्या उपांत्य फेरीच्या पात्रतेवर शिक्कामोर्तब केला. आता या स्पर्धेत दबंग दिल्ली आणि जयपूर पेट्रीयट्स यांच्यात पहिला उपांत्य फेरीचा सामना तर विद्यमान विजेता धेम्पो गोवा चॅलेंजर आणि यू मुम्बा यांच्यात दुसरा उपांत्य सामना खेळविला जाणार असून 15 जूनला अंतिम सामना होईल.









