वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2025 च्या प्रो कब•ाr लीग स्पर्धेतील दिल्लीत सुरू असलेल्या टप्प्यातील सामन्यात गुमान सिंगच्या शानदार कामगिरीच्या जोरावर युपी योद्धाजने यु मुम्बाचा 40-24 अशा 16 गुणांच्या फरकाने दणदणीत पराभव करत पुन्हा आपली गाडी विजयाच्या रुळावर आणली.
या सामन्यामध्ये युपी योद्धाजला विजयाची नितांत गरज होती. आघाडी फळीतील गुमान सिंगला त्याच्या सहकाऱ्याकडून चांगली साथ मिळाली. खेळाला प्रारंभ झाल्यानंतर सुमितने टॅकल गुण मिळवून युपी योद्धाजचे खाते उघडले. त्यानंतर गगन गौडाने आपल्या चढाईवर युपी योद्धाजला आणखीन एक गुण मिळवून दिला. युपी योद्धाजच्या रायडर्सनी यु मुम्बावर चांगलेच दडपण राखत पहिल्या 3 मिनिटांत 4 गुणांची आघाडी आपल्या संघाला मिळवून दिली. आक्रमक चढाई करणारे आणि बचाव फळीतील कब•ाrपटू यांच्यात योग्य समन्वय राखल्याने युपी योद्धाजने हा सामना मोठ्या फरकाने जिंकला.
परवेश बन्सवालने आपल्या चढाईवर यु मुम्बाला 2 गुण मिळवून दिले. त्यानंतर यु मुम्बाने युपी योद्धाजशी 5-5 अशी बरोबरी साधली. यु मुम्बाने चढाईवर आणखीन एक गुण घेत युपी योद्धाजवर आघाडी मिळविली. पण योद्धाजने पुन्हा बरोबरी केली. दोन्ही संघामध्ये आघाडी घेण्यासाठी कडवी चुरस पहावयास मिळाली. संदीप सिंगने आपल्या चढाईवर गुण वसुल करत युपी योद्धाजला 9-6 अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या मध्यंतरावेळी युपी योद्धाजने यु मुम्बावर 13-11 अशी दोन गुणांची बढत मिळविली. मात्र सामन्याच्या उत्तरार्धात यु मुम्बाच्या चढाईपटूंनी दमदार खेळ करत यु मुम्बाचे सर्व गडी बाद केले. त्यानंतर गुमान सिंगने आपल्या सुपर रेडवर युपी योद्धाजला 23-16 असे आघाडीवर नेले. यावेळी यु मुम्बाचे सर्वगडी बाद झाले. गुमान सिंगने आणखी एकदा यु मुम्बाचे दुसऱ्यांदा सर्वगडी बाद करुन आपल्या संघाला 10 गुणांची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात युपी योद्धाजने तीनवेळा यु मुम्बाचे सर्वगडी बाद केल्याने अखेर हा सामना युपी योद्धाजने 40-24 अशा 16 गुणांच्या फरकाने जिंकला.









