16 संघांचा समावेश, भारतापुढे वर्चस्व राखण्याचे आव्हान, उद्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने मोहिमेस सुरुवात
वृत्तसंस्था /ब्लोमफाँटेन
19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आज शुक्रवारपासून येथे सुरू होत असून या स्पर्धेतून अनेक स्वप्ने झेप घेतील आणि उज्ज्वल भविष्याचा पाया घालतील. या स्पर्धेचे विक्रमी पाच वेळा जेतेपद मिळविलेला भारत आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी, तर प्रतिस्पर्धी संघ हे वर्चस्व रोखण्यासाठी प्रयत्न करतील. 19 वर्षांखालील विश्वचषक ही भविष्यातील क्रिकेट स्टार्सचा उदय घडविणारी स्पर्धा म्हणून विख्यात आहे.
या स्पर्धेतून 2000 मध्ये युवराज सिंग, 2006 मध्ये रोहित शर्मा, 2008 मध्ये विराट कोहली आणि रवींद्र जडेजा, 2016 मध्ये ऋषभ पंत आणि इशान किशन, तर 2018 मध्ये शुभमन गिल असे भारतीय क्रिकेटपटू उदयाला आलेले आहेत. जागतिक स्तरावरही या स्पर्धेने असे खेळाडू दिलेले आहेत की, जे पुढे खेळातील दिग्गज बनले. परंतु त्याचबरोबर असे बरेच खेळाडूही आहेत की, ज्यांना या स्पर्धेत दाखविलेल्या क्षमतेनुरुप कामगिरी पुढे करता आली नाही. यामध्ये रविकांत शुक्ला, मनीष पांडे, उन्मुक्त चंद, यश धुल्ल, मनज्योत कालरा आणि कमलेश नागरकोट्टी यांचा समावेश होतो. या स्पर्धेत सर्वांच्या नजरा पुन्हा भारताकडे असतील. भारताचे नेतृत्व पंजाबचा उदय सहारन करत असून ते शनिवारी ‘अ’ गटात बांगलादेशविऊद्धच्या सामन्याने मोहिमेला सुऊवात करतील. ‘अ’ गटात अमेरिका आणि आयर्लंड यांचाही समावेश आहे. ही स्पर्धा 11 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून बेनोनी येथे अंतिम सामना होईल. सोळा संघांची चार गटांत विभागणी करण्यात आली असून पहिले तीन संघ ‘सुपर सिक्स’मध्ये दाखल होतील. तेथे 12 संघांना दोन गटांमध्ये विभागले जाईल. त्यानंतर अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचणार असून बेनोनी येथे 6 आणि 8 फेब्रुवारी रोजी ही फेरी होणार आहे.
यावेळी भारताची योग्य तयारी झालेली नाही आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या शिबिरांच्या मालिकेत तसेच आशिया चषक आणि दक्षिण आफ्रिकेत नुकतीच संपलेली तिरंगी मालिका अशा फक्त दोन स्पर्धा खेळून ते येथे आले आहेत. यादरम्यान त्यांना धक्के सहन करावे लागलेले असून त्यात आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात येण्याचा समावेश होतो. सहारनच्या नेतृत्वाखालील संघाला बांगलादेशकडून चार गडी राखून पराभूत व्हावे लागले. पण तेव्हापासून संघाच्या वाटचालीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. अफगाणिस्तान हा तिसरा संघ राहिलेल्या दक्षिण आफ्रिकेतील तिरंगी मालिकेत ते अपराजित राहिले. या महिन्याच्या सुऊवातीला झालेल्या या मालिकेतील अंतिम सामना पावसात वाहून गेल्याने भारत आणि दक्षिण आफ्रिकेला संयुक्तरीत्या विजेते घोषित करण्यात आले. असे असले, तरी व्यापक तयारीशिवाय भारत 19 वर्षांखालील चषकावरील आपली पकड कायम ठेवण्यास सक्षम आहे की नाही हे दिसून येणे बाकी आहे.
भारतानंतर जेतेपदांच्या बाबतीत 1988, 2002 आणि 2010 अशी तीन वेळा स्पर्धा जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो. पाकिस्तानने 2004 आणि 2006 मध्ये विजेतेपद मिळवलेले आहे, तर बांगलादेश (2020), दक्षिण आफ्रिका (2014), वेस्ट इंडिज (2016) आणि इंग्लंड (1998) यांनी एकदा स्पर्धा जिंकलेली आहे. भारताच्या संघात अर्शिन कुलकर्णी याचा समावेश असून तो आयपीएल लिलावात करारबद्ध झालेल्या संघातील फक्त दोन खेळाडूंपैकी एक आहे. ‘महाराष्ट्र प्रीमियर लीग’मधून पुढे आलेल्या अर्शिनने ऋतुराज गायकवाड, केदार जाधव आणि राहुल त्रिपाठी यांसारख्यांना मागे टाकतना सर्वाधिक षटकार (19) त्यात खेचून दाखविलेले आहेत. चेन्नई सुपर किंग्सने करारबद्ध केलेल्या अरावेली अवनीशने नोव्हेंबरमध्ये चौरंगी मालिकेत 93 चेंडूंत 163 धावा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले आहे. नंतर विनू मांकड चषक स्पर्धेतही त्याने छाप पाडली. गतवर्षीच्या कूचबिहार ट्रॉफीमधील सर्वोत्तम खेळाडू मुशीर खान आणि कर्णधार सहारन यांच्याही भूमिका महत्त्वपूर्ण राहतील. सहारनने तिरंगी मालिकेतील तीन डावांत 112, 74 आणि नाबाद 50 अशा खेळी करून चमक दाखविलेली आहे. दुसरीकडे, गोलंदाजीत राज लिंबानीने नेपाळविऊद्ध 13 धावांत 7, तर उपकर्णधार सौम्य पांडेने अफगाणिस्तानविऊद्ध 29 धावांत 6 बळी घेऊन प्रभावित केलेले आहे. इतर संघांमध्ये, न्यूझीलंडचा रेहमान हेकमत, पाकिस्तानचा उदयोन्मुख वेगवान गोलंदाज उबेद शाह, अफगाणिस्तानचा ऑफस्पिनर अल्लाह मोहम्मद गझनफर आणि इंग्लंडचा लुक बेनकेनस्टाईन यांच्यावरही नजरा राहतील. यजमान दक्षिण आफ्रिका आपल्या मोहिमेची सुऊवात ‘ब’ गटात वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याने करणार आहे.
स्पर्धेतील गटांची रचना
- ‘अ’ गट बांगलादेश, भारत, आयर्लंड, अमेरिका
- ‘ब’ गट इंग्लंड, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज
- ‘क’ गट ऑस्ट्रेलिया, नामिबिया, श्रीलंका, झिम्बाब्वे
- ‘ड’ गट अफगाणिस्तान, नेपाळ, न्यूझीलंड, पाकिस्तान
आजचे सामने
- आयर्लंड वि. अमेरिका
- द.आफ्रिका वि. विंडीज









