ऑनलाईन टीम / पोटशेफस्ट्रूम :
अंडर 19 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानने दिलेल्या 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालच्या शतकाच्या आणि दिव्यांश सक्सेनाच्या अर्धशतकाच्या जोरावर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. जयस्वालने नाबाद 105 तर दिव्यांशने नाबाद 59 धावा केल्या.
दरम्यान, उपांत्य फेरीत पाकिस्तानने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, भारतीय गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे पाकिस्तानच्या संघाने 43 ओव्हरमध्ये केवळ 171 धावा केल्या.
पाकिस्तानकडून रोहेल नझीर 62, हैदर अली 56 तर मोहम्मद हॅरीसने 21 धावा केल्या. भारताच्या सुशांत मिश्राने 28 धावा देत तीन गडी बाद केले. कार्तिक त्यागी आणि रवि बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन तर अंकोलेकर आणि जयस्वालने प्रत्येकी एक गडी बाद केला.









