संवेदनशील दस्तऐवज पोहोचले मालीमध्ये : रशियाचा मित्रदेश
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या सैन्याची निगडित लाखो संवेदनशील ईमेल चुकीमुळे माली या देशाला पाठविण्यात आले. हा धक्कादायक प्रकार एका छोट्याशा टायपिंग एररमुळे घडला आहे. माली हा एक पश्चिम आफ्रिकन देश असून तो रशियाचा सहकारी आहे. लीक झालेल्या ईमेलमध्ये राजनयिक दस्तऐवज, टॅक्स रिटर्न, पासवर्ड आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दौऱ्याशी निगडित तपशील नमूद होते.
अमेरिकेचे सैन्य ‘एमआयएल’ डोमेनचा वापर करते. मेल पाठवितेवेळी ‘आय’ हा शब्द टाइप न झाल्याने सर्व माहिती मालीचा डोमेन ‘एमएल’वर पोहोचली. चुकीच्या अॅड्रेसवर पाठविण्यात आलेले हे ईमेल अमेरिकेच्या सैन्याच्या स्टाफकडून पाठविले जात होते. अमेरिकेच्या सैन्यासोबत काम करणारे ट्रॅव्हल एजंट, अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचे कर्मचारीही या चुकीची पुनरावृत्ती करत होते.
ही चूक सर्वप्रथम डच इंटरनेट एंटरप्रेन्योर जोहान्स जुर्बियरने शोधून काढली. जोहान्स हे माली सरकारच्या ईमेल्सना हाताळतात. अमेरिकेच्या सरकारला अनेकदा याविषयी कळविले आहे, परंतु मागील 10 वर्षांपासून असेच घडत असल्याचे जोहान्स यांनी म्हटले आहे. जानेवारीपासून आतापर्यंत 1 लाख 17 हजार चुकीचे ईमेल प्राप्त झाले आहेत असेही त्यांनी सांगितले.
तर हा प्रकार कळताच पेंटागॉनने यावर उपाययोजना करण्यासाठी पावले उचलण्यात आल्याचे सागितले. संरक्षण विभागाला यासंबंधी कल्पना आहे. ईमेल पाठविणाऱ्या सर्व लोकांना ईमेल अॅड्रेस टाइप केल्यावर त्याची पडताळणी करण्याची सूचना केली गेल्याचे पेंटागॉनचे प्रवक्ते लेफ्टनंट कमांडर टिम गोर्मन यांनी म्हटले आहे.









