बेतोडा निरंकाल रस्त्यावरील समस्या
दाभाळ : निरंकाल ते बेतोडा दरम्यान मुख्य रस्त्याच्या बाजूला भूमीगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी केलेल्या खोदकामानंतर चर व्यवस्थित बुजविण्यात न आल्याने वाहतुकीसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. पावसाळ्यात खोदकाम केलेल्या ठिकाणी वाहने रुतून पडण्याचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांनी त्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. निरंकाल बेतोडा या मुख्य रस्त्यावरून फोंड्याकडे ये-जा करणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. आधीच हा रस्ता अरुंद आहे. त्यात भूमीगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम केल्याने रस्ता अधिकच आखूड बनला आहे. खोदकाम केल्यानंतर त्यावर रोबलदगड टाकून डांबरीकरण आवश्यक होते. मात्र माती टाकून खोदलेले चर बुजविण्यात आल्याने त्यात पावसाचे पाणी शिरून भूसभूशीत बनलेल्या रस्त्याच्या बाजूला चाके रुतून वाहने अडकून पडत आहेत. पावसाळ्यात ही समस्या उद्भवणार याची कल्पना कंत्राटदार व वीजखात्याला देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज वाहनचालकांना त्याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे. तसेच काही ठिकाणी मधोमध रस्त्यावर खोदकाम करण्यात आले असून हे चरही काँक्रिट घालून बुजवण्याची आवश्यकता होती. वाहनचालकांसाठी ते धोकादायक बनले असून दुचाकी चालकांना त्यांचा अंदाज येत नसल्याने छोटे मोठे अपघात घडत आहेत. वीज खात्याने यासमस्येवर तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांतर्फे केली जात आहे.









