लोकांवर दुर्गंधीचा सामना करण्याचा प्रसंग, पालिकेकडून दुर्लक्ष
मडगाव : मडगाव पालिका इमारतीखालीच सांडपाणी वाहण्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू असून पालिकेकडून यावर उपाययोजना राबविण्यास विलंब होत असल्याने लोकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. पालिका वाचनालयासमोरील सांडपाण्याचे चेंबर भरून सांडपाणी बाहेर पडत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे पालिका वाचनालयाला भेट देणाऱ्यांना तसेच येथे बसून पादत्राणांची दुरुस्ती करणाऱ्यांना त्रास होऊ लागला आहे. पालिका इमारतीचे चेंबर भू-गटार वाहिनीला जोडले आहे की नाही याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. वाहणारे सांडपाणी पालिका इमारतीला भिडून असलेल्या भू-गटार वाहिनीचे असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात येत आहे. सदर वाहिनी तुंबल्याने पालिकेचे सांडपाण्याचे चेंबर भरून वाहत असल्याचे सांगण्यात येत आहे.
पालिकेकडून उपाययोजना करण्यास चालढकल
परंतु या वाहणाऱ्या सांडपाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्याच्या बाबतीत मात्र पालिका चालढकल करत असल्याचे दिसून येत आहे. मडगाव पालिकेचे नगराध्यक्ष गेले दोन दिवस देवदर्शनासाठी बाहेरगावी होते. मुख्याधिकारी मंगळवारी पालिकेत उपस्थित होत, मात्र त्यांनी पालिकेच्या एका बाजूने मल-मूत्र वाहून साचून राहण्याचा प्रकार गांभीर्याने घेतल्याचे दिसून आले नाही. स्वच्छतेच्या बाबतीत पालिका क्षेत्राची जबाबदारी असलेल्या पालिकेचे स्वत:च्या इमारतीनजीक पसरलेली घाण साफ करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक आमदार दिगंबर कामत यांनी यात लक्ष घालून उपाययोजना राबवावी, अशी मागणी मडगाववासियांकडून होत आहे.









