प्रतिनिधी,अहिल्या परकाळे
पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉल तिकीट उपलब्ध करून दिले आहे. राज्य शिक्षण मंडळांनी शाळा-ज्युनिअर कॉलेजच्या लॉगईन आयडीवर विद्यार्थ्यांची हॉलतिकीट पाठवली आहेत. शाळांनीही मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांच्या सहीने हॉलतिकीटाचे वाटप केले. पेपर फुटीचे प्रकार टाळण्यासाठी कस्टडीतून परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका घेवून जाणाऱ्या सहाय्यक परीक्षकाच्या मोबाईलला लाईव्ह ट्रॅकर लावला जाईल. त्यामुळे प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर वाटप होईपर्यंतच्या सर्व हालचाली परीक्षा कस्टडीयनला लाईव्ह दिसणार आहेत.परिणामी प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकाराला आळा बसणार,हे निश्चित.
बारावीची प्रॅक्टीकल परीक्षा सध्या सुरु असून 21 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत लेखी परीक्षा होणार आहे.कोल्हापूर विभागीय शिक्षणमंडळ अंतर्गत परीक्षेसाठी लागणाऱ्या साहित्याचे वाटप पूर्ण झाले आहे. प्रॅक्टीकल परीक्षाही अंतिम टप्प्यात असून विद्यार्थ्यांकडून परीक्षेची जय्यत तयारी सुरू आहे. पुणे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून शाळांच्या लॉग ईन आयडीवर पाठवलेल्या दहावी-बारावी परीक्षांच्या हॉलतिकीटाचे वाटप पूर्ण झाले. तरीही हॉलतिकीटावर कोणतीही त्रुटी आढळल्यास कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाकडून दुरूस्ती करून घेण्याचे आवाहन विभागीय शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना केले आहे.
दहावी-बारावी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकार वारंवार घडत असल्याने शिक्षण मंडळाची बदनामी होते. हा प्रकार टाळण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यापुर्वी परीक्षेपुर्वी आर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिकेचे वितरण केले जायचे. आता मात्र परीक्षा सुरू होण्यापुर्वी दहा मिनिट अगोदर प्रश्नपत्रिकेचे वाटप केले जाईल. तसेच सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह भरारी पथक असल्याने परीक्षेतील कॉपीसारख्या गैरप्रकाराला आळा बसणार असल्याचे शिक्षण मंडळाचे म्हणने आहे.
दहावी-बारावी विद्यार्थी, केंद्र व शाळा
बारावी
विद्यार्थी केंद्र शाळा
130743 355 2424
दहावी
विद्यार्थी केंद्र शाळा
120790 170 976
परीक्षेच्या नियम व अटी
दहावी-बारावीचा पेपर सुरू होण्यापुर्वी आर्धा तास म्हणजेच सकाळी 11 वाजता पेपर सुरू होणार असला तर विद्यार्थ्यांनी सकाळी 10.30 वाजता परीक्षा केंद्रात उपस्थित राहायचे आहे. विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिका 10.50 ला दिली जाणार आहे. केंद्र संचालकांनी 10.40 ला प्रश्नपत्रिकेचे बंडल फोडून पर्यवेक्षकांना प्रश्नपत्रिका पाकीटांचे वाटप करावे. दोन विद्यार्थ्यांची सही घेवून बरोबर 11 वाजता पर्यवेक्षकांनी प्रश्नपत्रिकेचे पाकीट फोडून वाटप केले जाणार आहे.
नवीन तंत्रज्ञानामुळे परीक्षेत पारदर्शकता
कोरोनात ऑनलाईन परीक्षेमुळे गुणांचा फुगवटा झाला होता. सध्या पारंपारिक पध्दतीने वर्णनात्मक परीक्षा घेतल्याने गुणांचा फुगवटा होणार नाही. तसेच नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षेत पारदर्शकता आणत, गैरप्रकार टाळण्याचा प्रयत्न केला आहे.
विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी
पारंपारिक पध्दतीने परीक्षा होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी. फिरती व बैठी भरारी पथके असल्याने कॉपीसारखे गैरप्रकार करू नयेत. परीक्षेची तयारी करूनच परीक्षा देत असल्याने निर्भिडपणे उत्तरपत्रिका सोडवावी. पालकांनी आपल्या पाल्याला परीक्षेविषयी मार्गदर्शन करून, आत्मविश्वास निर्माण करावा.
बी. एस. पोवार (प्रभारी सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळ)
सरावाला वेळ मिळाल्याने पेपर सोपा जाईल
अभ्यासाचा सराव सुरू असून दिवसातील जवळपास पाच ते सहा तास अभ्यास करतो. सर्वच विषयांच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव आणि वाचन, पाठांतर सुरू आहे. कोरोनामुळे अभ्यास करण्याला व सरावाला वेळ मिळाल्याने पेपर सोपे जातील असेच वाटते. नवीन नियमानुसार पेपरफुटीचे प्रकार कमी होणार असल्याने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेत.
संतोष कांबळे (केएमसी कॉलेज)
Previous Articleस्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ऑक्टोबरपर्यत ‘प्रशासक राज’ ?
Next Article LTTE प्रमुख प्रभाकरन जिवंत; तमिळ नेत्याचा दावा









