वृत्तसंस्था /हरारे
निर्बंध घालण्यात आलेल्या उत्साहवर्धक उत्तेजक द्रव घेतल्याचे आढळल्याने झिंबाब्वेचे दोन क्रिकेटपटू वेस्ले मधेवेरे आणि ब्रँडन मवुता यांच्यावर क्रिकेट झिंबाब्वेने निलंबनाची कारवाई केली आहे. क्रिकेट झिंबाब्वेने गुरुवारी या संदर्भात अधिकृत घोषणा केली. अलीकडेच झिंबाब्वेमध्ये झालेल्या क्रिकेट स्पर्धेनंतर अचानक उत्तेजक चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये मधेवेरे आणि मवुता यांनी उत्साहवर्धक उत्तेजक द्रव घेतल्याचे त्यांच्या मूत्रल चाचणीमध्ये आढळून आले. उत्तेजक विरोधी नियमानुसार या प्रकरणाची सुनावणी आता शिस्तपालन समितीसमोर होणार आहे. मात्र, या दोन्ही क्रिकेटपटूंनी निश्चित कोणते द्रव घेतल्याचे मात्र गुपीत ठेवण्यात आले आहे. आयर्लंड विरुद्ध नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेत झिंबाब्वे संघात या दोन्ही खेळाडूंचा समावेश होता. झिंबाब्वेने ही मालिका 1-2 अशी गमवली. आयसीसीच्या आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी झिंबाब्वेचा संघ आपली पात्रता सिद्ध करू न शकल्याने झिंबाब्वे संघाचे प्रमुख प्रशिक्षक डेव हॉटन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. झिंबाब्वे क्रिकेट संघटनेच्या नियमावलीनुसार या दोन्ही क्रिकेटपटूंवर शिस्तभंगाची कारवाई केली असून पुढील आठवड्यात या प्रकरणाची सुनावणी शिस्तपालन समितीसमोर होणार असल्याचे सांगण्यात आले. 26 वर्षीय मवुताने कसोटी, वनडे आणि टी-20 प्रकारात झिंबाब्वेचे प्रतिनिधीत्व केले आहे. 23 वर्षीय मधेवेरेने 2020 साली आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केले होते.









