अन्य दोघे गंभीर जखमी, गोमेकॉत उपचार : भजनातून घरी परतताना काळाचा घाला
म्हापसा : साळगाव-पर्रा हमरस्त्यावरील माडानी येथे बुधवारी रात्री उशिरा झालेल्या दुचाकी अपघातात मोहम्मद फैयाज (वय 30, वास्को, मूळ उडपी, कर्नाटक) आणि ओंकार कारापूरकर वय 25 रा. (थिवी) हे दोघे जागीच ठार झाले, तर फैयाजची बहीण जुबीन सुलताना व दुचाकीवरील दीपेश पेडणेकर हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गोमेकॉ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून जुबीननाच्या पायाला तर दीपेशच्या हात व पायांना गंभीर दुखापती झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. हा अपघात बुधवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घडला. फैयाज आणि जुबीन हे पर्राहून साळगावकडे, तर ओंकार व दीपेश हे साळगावहून म्हापसाच्या दिशेने येत होते.
साळगाव-पर्रा हमरस्त्यावर मध्यभागी दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. धडकेनंतर चौघेही जमिनीवर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. सर्वांना तातडीने म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी फैयाज आणि ओंकार यांना मृत घोषित केले. जखमी जुबीन व दीपेश यांना पुढील उपचारासाठी गोमेकॉत हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक विकास आरोलकर यांनी म्हापसा जिल्हा अझिलो इस्पितळात धाव घेतली व मयतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन धीर दिला. नंतर जखमींना घेऊन गोमेकॉत दाखल झाले. अपघाताचे वृत्त थिवी परिसरात समजल्यानंतर गावातील नागरिकांनी म्हापसा जिल्हा इस्पितळात धाव घेतली. ओंकारच्या अपघाती मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. ओंकार कारापूरकर यांनी कंपनी सेव्रेटरी पदाची परीक्षा दिली होती.
ओंकार उत्कृष्ट भजनी कलाकार होता
ओंकार एक उत्कृष्ट भजनी कलाकार म्हणून त्याची ख्याती होती. अपघाताची माहिती मिळताच त्याच्या पालकांनी आझिलो इस्पितळात धाव घेऊन तेथील दृश्य पाहून त्यांनी टाहो फोडला. अपघाताचा पंचनामा साळगाव पोलिसस्थानकाचे निरीक्षक मिलिंद भुईंबर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. घटनास्थळी सर्वत्र रस्त्यावर रक्त सांडले होते तर दुचाकींच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला होता.
आईने फोनवर शेवटचा आवाज ऐकला!
ओंकार कारापूरकर भजनासाठी साळगाव येथे गेला होता. रात्री उशीर झाल्याने त्याच्या आईने फोनवरून ओंकारला 11.20 वाजता घरी येण्याबाबत विचारले असता बाहेर पडलो, असे त्याने आईला सांगितले. मात्र 11.30 वाजता घरी ओंकारला अपघात झाल्याची माहिती घटनास्थळावरून दिल्याची माहिती तिच्या आईने दिली. सदर घटनेने शोक अनावर होत तिने टाहो फोडला. तो फेन ओंकारचा शेवटचा ठरल्याचे त्या म्हणाल्या.









