अज्ञात वाहनाची मोटारसायकलला धडक
बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील मुत्यानट्टी उड्डाणपूलावर सोमवारी रात्री झालेल्या वाहन अपघातात गौंडवाड (ता. बेळगाव) येथील दोन तरुण जागीच ठार झाले. या अपघातानंतर घटनास्थळी गर्दी जमली होती. सोमवार दि. 20 जानेवारी रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. अज्ञात वाहनाने मोटारसायकलला ठोकरल्याने दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच काकतीचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे, उपनिरीक्षक मृत्यूंजय मठद आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सक्षम यादो पाटील (वय 20), सिद्धार्थ बाळू पाटील (वय 23, दोघेही रा. शिवाजी गल्ली-गौंडवाड) अशी त्या दुर्दैवी तरुणांची नावे आहेत.
सक्षमच्या पश्चात आई, वडील, भाऊ, तर सिद्धार्थच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे. रात्री दोन्ही मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात हलविण्यात आले आहेत. शवागाराबाहेर गावकऱ्यांनी गर्दी केली होती. गांधी भारत कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ बेळगावात असताना हा अपघात घडला आहे. बहुतेक अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या बंदोबस्तात होते. अपघातानंतर लगेच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. अपघातानंतर वाहन चालकाने आपल्या वाहनांसह पलायन केले असून काकती पोलीस त्याचा शोध घेत आहेत.









