चिपळूण प्रतिनिधी
: तालुक्यातील गोवळकोट रोड येथील आठ युवकांचा ग्रुप तीन मोटार सायकलवरून फिरण्यासाठी कुंभार्लीतील नदीवर गेला होता. या आठ तरुणांपैकी नदीत उतरलेले दोन तरुण वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. ही घटना रविवारी सांयकाळी घडली. पाण्यात बुडालेल्या युवकांची नावे आतीक इरफान बेबल (१६) अब्दुल कादीर नौशाद लसाने (१७) अशी आहेत. दोघेही चिपळूणचे रहिवासी आहेत.
रविवारी सायंकाळी आठ युवक तीन दुचाकी घेऊन आशरकोंडा येथे नदीच्या ठिकाण फिरण्यासाठी बाहेर पडले. त्यातील दोघेजण नदीमध्ये उतरले. त्यावेळी वरच्या बाजूला जोरदार पाऊस पडत असल्यामुळे आणि नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने बाकीचे सहाजण किनाऱ्यावरच्या झोपडीमध्ये उभे होते. अचानक वाचवा वाचवा असा आवाज आल्याने झोपडीत असलेले युवकांनी त्या दिशेने धाव घेतली मात्र पाण्यात उतरलेले दोघेजण बुडाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबतची माहिती आपल्या पालकांना दिली. पालकांनी तत्काळ चिपळूण नगर परिषदेला कळवले. या बाबतचे वृत्त समजताच नगर परिषदेच्या बचाव पथकाने व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली, आणि शोधकार्य सुरु केले. पाण्याचा प्रवाह जास्त व अंधार झाल्याने पाण्यात उतरणे शक्य नव्हते, तसेच शोध कार्यात अडचणी येत होत्या. रात्री उशीरापर्यंत बुडालेल्या युवकांचा शोध सुरू होता.