जत प्रतिनिधी
जत तालुक्यातील संख दरीबडची रस्त्यावर मोटरसायकल व ट्रॅक्टर यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले आहेत.अरविंद गोविंद कोरे (वय.२२) सुभाष मनोहर कांबळे (वय.२४) (रा. खंडनाळ)असे अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. ही घटना बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. रात्री उशिरा या घटनेची पोलिसात नोंद नव्हती.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, अरविंद कोरे व सुभाष कांबळे हे दोघेजण चांगले मित्र आहेत. दोघेही काही कामानिमित्त संखला मोटर सायकल वरून निघाले होते.
दरम्यान दरीबडचीकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरला मोटरसायकलने जोरात धडक दिली. यात अरविंद कोरे व सुभाष कांबळे हे दोघेजण जागीच ठार झाले आहे. घटनेची माहिती मिळताच उमदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री उशिरा ग्रामीण रुग्णालयात शवाविच्छेदन सुरू होते.








