मोटरसायकलला ठोकरल्याने आंबेवाडीचे तरुण जागीच ठार
बेळगाव : भरधाव टिप्परने मोटरसायकलला ठोकरल्यामुळे बुधवारी सायंकाळी झालेल्या अपघातात आंबेवाडी, ता. बेळगाव येथील दोन तरुण जागीच ठार झाले. अगसगा रोडवरील खडी मशीननजीक ही घटना घडली आहे. काकती पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. नितेश वैजू तरळे (वय 27), योगेश संभाजी न्हावी (वय 24) दोघेही राहणार आंबेवाडी अशी त्या दुर्दैवी तरुणांची नावे आहेत. टिप्परखाली सापडून ते जागीच ठार झाले. घटनेची माहिती समजताच काकतीचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे, उपनिरीक्षक मृत्युंजय मठद व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.
बुधवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. अपघातानंतर घटनास्थळी गर्दी जमली होती. या मार्गावर भरधाव टिप्परमुळे अपघात नित्याचेच झाले आहेत. टिप्परचालक अतिवेगाने आपले वाहन चालवत होता. त्यामुळे हा अपघात घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नितेशच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी तर योगेशच्या पश्चात आई, बहीण असा परिवार आहे. अपघातानंतर टिप्पर तेथेच सोडून चालकाने पलायन केले होते. त्यानंतर चालक काकती पोलीस स्थानकात पोहोचला आहे. नेमका अपघात कसा घडला? याची माहिती मिळवण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आंबेवाडी गावावर शोककळा
आंबेवाडी येथील नितेश वैजू तरळे व योगेश संभाजी न्हावी या दोघा तऊणांच्या अपघाती निधनामुळे गावावर शोककळा पसरली आहे. ते दोघही शिवलिंगनगर नवीन वसाहत या ठिकाणी राहत होते. त्यांच्या अपघाती निधनाने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अंत्यविधी गुऊवार दि. 30 रोजी सकाळी 11 वाजता आंबेवाडी स्मशानभूमीत होणार आहे.









