‘देवदूत’ ठरलेल्या पाच डॉक्टरांकडून उपचार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
डॉक्टर हे देवाचे दुसरे रूप आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. खरे तर, कर्नाटकातील बेंगळूरहून राजधानी दिल्लीला येणाऱ्या विस्तारा एअरलाईनच्या विमानात श्वास कोंडल्यामुळे मृत्यूशी झुंज देणाऱ्या एका तान्हुल्या मुलीला वाचवण्यात यश आले आहे. याच विमानातून प्रवास करणाऱ्या पाच डॉक्टरांनी एका दोन वर्षीय चिमुरडीचा जीव वाचवला. या घटनेला दिल्ली एम्सने सोशल मीडियावर दुजोरा दिला आहे.
27 ऑगस्ट रोजी बेंगळूरहून दिल्लीला जात असलेल्या विस्तारा एअरलाईनच्या युके-814 फ्लाइटमध्ये दोन वर्षांची मुलगी अचानक आजारी पडली. या मुलीला सायनोटिक आजाराने ग्रासले होते. तिचे इंट्राकार्डियाकचे ऑपरेशन करण्यात आले होते. मात्र, हवाई प्रवासात मुलीची तब्येत इतकी बिघडली की ती बेशुद्ध झाली. मुलीला अशा स्थितीत पाहून तिचे कुटुंबीय आणि विमानात उपस्थित असलेले लोक प्रचंड घाबरले. याचदरम्यान, विमानात उपस्थित असलेल्या दिल्ली एम्सच्या पाच डॉक्टरांनी देवाचे रूप दाखवून मुलीला वाचवले.
हात पाय पडले थंड
वास्तविक, मुलीची प्रकृती बिघडल्याचे डॉक्टरांना कळताच त्यांनी तातडीने तपासणी करून घेतली. बाळाची नाडी बंद पडली होती, हात-पाय थंड होते, श्वास घेता येत नव्हता. एवढेच नाही तर तिचे ओठ आणि बोटेही पिवळी दिसत होती. तिला तातडीने सीपीआर देण्यात आला. यादरम्यान फ्लाईटमध्येच असलेल्या डॉक्टरांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर मुलीला वाचविण्यासाठी बरेच प्रयत्न केले. उपचारादरम्यान मुलीला हृदयविकाराचा झटका आल्याने डॉक्टरांसमोरील अडचणी वाढल्या. मात्र डॉक्टरांनी सुमारे 45 मिनिटे मुलीवर उपचार करत आपल्याकडे असलेल्या सर्व साधनांचा वापर करून मुलीचे प्राण वाचवले. 45 मिनिटे उपचार केल्यानंतर विमान नागपूरला नेण्यात आले आणि येथील बालरोग तज्ञांकडे सोपवण्यात आले. मुलीची प्रकृती आता धोक्मयाबाहेर आहे.
‘एम्स’च्या पाच डॉक्टरांचा सहभाग
दिल्ली ‘एम्स’च्या पाच डॉक्टरांनी मुलीला वाचवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. डॉ. नवदीप कौर, डॉ. दमनदीप सिंग, डॉ. ऋषभ जैन, डॉ. ओशिका आणि डॉ. अवचला टॅक्सक अशी सदर डाक्टरांची नावे आहेत.









