माळमारुती पोलीस स्थानकात घटनेची नोंद
बेळगाव : शिंदोळी क्रॉस, बसवनकुडची येथे सुरू असलेल्या एका बहुमजली इमारतीवरून पडून दोघा कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 9.30 वाजता घडली. परितोषकुमार मंडल (वय 32), इंद्रजीत रॉय (वय 22, दोघेही मुळ रा. पश्चिम बंगाल, सध्या रा. बसवनकुडची) अशी मृत कामगारांची नावे आहेत. घटनेची नोंद माळमारुती पोलीस स्थानकात झाली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका बहुमजली इमारतीचे काम सुरू असताना सदर दोघेही कामगार लिफ्टमधून पाचव्या मजल्यावर गेले होते. यावेळी पायाडाची फळी मोडून सदर दोघेही कामगार उंचावरून कोसळले. तात्काळ त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराचा उपयोग झाला नाही. या दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. घटना समजताच माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी माळमारुती पोलीस अधिक तपास करीत आहेत.









