मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडले, भुयारी गटार योजनेच्या कामावेळी दुर्घटना
बेळगाव : भुयारी गटार योजनेसाठी खोदकाम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी दुपारी फ्रुट मार्केटजवळ ही घटना घडली आहे. मृत कामगार मुडलगी तालुक्यातील पटगुंदीचे राहणारे होते. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कसलीच खबरदारी न घेता हाती घेतलेल्या कामामुळे ही दुर्घटना घडली असून कामगारांच्या मृत्यूनंतर एकही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी फिरकले नाही. त्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. यासंबंधी पुणे येथील एका कंपनीच्या व्यवस्थापकासह चौघा जणाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बसवराज दशरथ सरवी (वय 42), शिवलिंग मारुती सरवी (वय 20) दोघेही राहणार पटगुंदी अशी त्या दुर्दैवी कामगारांची नावे आहेत. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी भुयारी गटार कामासाठी ते बेळगावला आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गावी जाऊन ते पुन्हा परतले होते. बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास जेसीबीने खोदकाम सुरू होते. त्यानंतर खड्डा अधिक खोल करण्यासाठी कामगार खाली उतरले होते. 11.20 वाजण्याच्या सुमारास वरून मातीचा ढिगारा कोसळून बसवराज व शिवलिंग ढिगाऱ्याखाली अडकले.
या घटनेनंतर उर्वरित कामगार व स्थानिक नागरिकांनी त्वरित बचावकार्य सुरू केले. कामगारांनी फावड्याने माती हटवण्याचे काम हाती घेतले. मात्र, पुन्हा ढिगारा कोसळण्याची भीती लक्षात घेऊन जेसीबीने माती हटवण्यात आली. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ढिगाऱ्याखाली अडकलेल्या बसवराज व शिवलिंग यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यात आले. सिव्हिलला पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. दुपारी 4 वाजेपर्यंत दोन्ही मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील आपत्कालीन विभागात होते. पटगुंदी येथील त्यांचे नातेवाईक बेळगावात दाखल झाल्यानंतर मृतदेह शवागारात हलवण्यात आले. तोपर्यंत एकही प्रशासकीय अधिकारी सिव्हिल हॉस्पिटलकडे फिरकला नाही. या घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, मार्केटचे एसीपी संतोष सत्यनायक, माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.
चार वाजण्याच्या सुमारास बसवराज यांची पत्नी व कुटुंबीय सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात दाखल झाले. त्यांनी एकच आक्रोश केला. त्याआधीच शिवलिंगचा भाऊ बेळगावात दाखल झाला होता. बसवराज व शिवलिंग दोघेही गरीब कुटुंबातील मजूर होते. शिवलिंगच्या पश्चात वडील, भाऊ असा परिवार आहे. तो अविवाहित होता. तर बसवराजच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, पाच भाऊ असा परिवार आहे. गरीब मजुरांच्या अपघाती मृत्युमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. उपलब्ध माहितीनुसार राज्य पाणीपुरवठा व भुयारी गटार विभागाकडून अमृत योजनेंतर्गत पाईपलाईनचे काम सुरू असताना ही घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर महानगरपालिका किंवा जिल्हा प्रशासनाचा एकही अधिकारी घटनास्थळी फिरकला नाही. त्यामुळे गरीबांच्या जीवाला किंमत नाही का? असा प्रश्न उपस्थित करीत कुटुंबीयांनी जिल्हा प्रशासनावर टीका केली आहे.
मातीचा ढिगारा कोसळून मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या निधनाने पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. या घटनेची चौकशी करण्याची सूचनाही पालकमंत्र्यांनी केली असून दुर्दैवी कामगारांच्या कुटुंबीयांना महानगरपालिका व सरकारच्यावतीने भरपाई देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे सांगतानाच त्या दुर्दैवी कामगारांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. या घटनेला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुणे येथील एका कंपनीकडे कामाचे कंत्राट आहे. कंत्राटदार व अभियंत्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. ही प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, पाणीपुरवठा करणाऱ्या एल अँड टी कंपनीने यासंबंधी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. दुर्घटनेत बळी पडलेल्या कामगारांना श्रद्धांजली वाहतानाच एल अँड टीच्या कामावर ही घटना घडली नाही, असा खुलासा तिने केला आहे.
चौघा जणांविरुद्ध एफआयआर
सागर तळवार या तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून चौघा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पुणे येथील घारपुरे इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन कंपनीचे बेळगाव येथील प्रकल्प व्यवस्थापक नागराज मारुती पोतदार, साईट इंजिनिअर विश्वनाथ लिंगराज हिरेमठ, बिल्डिंग इंजिनिअर सुदीप मेणसीनकाई व सब कॉन्ट्रॅक्टर मोहसीन मैनुद्दीन शेख यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.









