1 तास वाहतूक ठप्प. अग्निशामक दलाने मोकळा केला रस्ता. महिलांच्या दुचाकीची किंचित मोडतोड. बच बचावली.
डिचोली : डिचोली ते साखळी या मार्गावर कुळण येथे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या घरासमोर एक झाड थेट रस्त्यावर पडल्याने सुमारे एक तास वाहतूक ठप्प राहिली. केवळ दैव बलवत्तर म्हणून दोन महिला या झाडाखाली चिरडण्यावाचून बचावल्या. करकचून ब्रेक दाबूनही त्यांच्या दुचाकीला किरकोळ झाडाची धडक बसली. तसेच त्यांच्या समोरून जाणारी प्रवासी बस या झाडाच्या धडकेतून सुखरूपपणे सुटली. डिचोली अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन सदर झाड पूर्णपणे रस्त्यावरून पटवून रस्ता मोकळा केला.
सदर घटना काल बुध. दि. 5 जुलै रोजी संध्या. 3.45 वा. च्या सुमारास घडली. कुळण कारापूर येथे रस्त्याच्या बाजूला असलेले एक झाड थेट रस्त्यावर पडले. हे झाड पडण्याच्या क्षणी एक प्रवासी बस तेथून जात होती. तर वाळपई येथून डिचोलीच्या दिशेने दुचाकीवरून निघालेल्या दोन महिला त्या बसच्या मागे होत्या. बस पुढे जात असतानाच अचानक झाड रस्त्याच्या दिशेने कलंडलू लागले. ते पाहताच केवळ एक मीटरच्या अंतरावर असलेल्या महिलेने दुचाकीचा करकचून ब्रेक दाबला. हा ब्रेक लागून गाडी उभी होईपर्यंत झाड पूर्णपणे रस्त्यावर आडवे झाले होते. हे झाड सदर दुचाकीच्या दर्शनी भागावर धडकले. त्यामुळे दर्शनी भागाचे काही प्रमाणात नुकसान झाले. तर सदर दुचाकी चालत असलेली असलेली वाळपई येथील सब्रीन शेख हि महिला या झाडामुळे दुचाकीवरच थोडीफार अडकून राहिली. अखेर त्यांनी स्वत:ची कशीबशी सुटका करून घेत त्या बाहेर आल्या. मात्र त्यांच्या पायांना या झाडामुळे दुखापत झाली. दुणाकीच्या मागे बसलेल्या महिलेचे नाव नयिमा सय्यद असे असून त्या दोघेही डिचोली येथे डॉक्टरांकडे जात होत्या. या अनपेक्षित घटनेमुळे त्या एकदम हादरल्या होत्या.
केवळ एका सेकंदवर होता अनर्थ
या घटनेतून बस सहीसलामत बचावली व आम्ही मागेच होतो. झाड खाली येत असल्याचे दिसताच आपण ब्रेक मारला. दुचाकी उभी होईपर्यंत पूर्ण झाड आमच्या समोर आडवे झाले. आणि गाडीच्या पुढील भागात घुसले. आपण त्यात अडकून पडले. एक सेकंद जरी आपण पुढे गेले असते तर सदर झाड आमच्या डोक्यावर पडले असते व अनर्थ झाला असता. आमचा वेळ बरा म्हणून आम्ही सुखरूप बचावलो, अशी भावना सब्रीन शेख व नयिमा सय्यद यांनी व्यक्त केली. या घटनेमुळे डिचोली ते साखळी मार्ग पूर्णपणे ठप्प झाला. दोन्ही बाजूंनी लांबच्या लाब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती डिचोली अग्निशामक दलाला देण्यात आल्यानंतर दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. व त्यांनी लागलीच रस्ता मोकळा करण्याचे काम हाती घेतले. वेगवानपणे झाड कापत ते रस्त्याच्या बाजूला काढले. यावेळी त्यांना अडकून पडलेल्या काही वाहनचालकांनीही मदत केली. अग्निशामक दलाचे अधिकारी राहुल देसाई हेही घटनास्थळी उपस्थित होते. त्यांच्या तसेच लिडींग फायर फायर फायटर प्रल्हाद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी काम केले.









