दोघांवर प्रत्येकी 14 लाखांचे बक्षीस
वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेशातील नक्षलग्रस्त बालाघाट भागात शनिवारी पहाटेच्या सुमारास पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या संघर्षात दलमच्या एरिया कमांडर आणि गार्ड असलेल्या दोन प्रमुख महिला नक्षलवाद्यांना पोलिसांनी ठार केले. दोघांवर 14-14 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. गेल्यावषी याच भागात पोलिसांनी 6 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी चकमकीत सहभागी जवानांचे कौतुक केले आहे.
पोलीस अधीक्षक समीर सौरभ यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 3 वाजता गढी पोलीसस्थानक हद्दीतील कडला जंगलात हॉकफोर्स आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी झालेल्या संघर्षात ‘हॉकफोर्स’च्या जवानांनी सुनीता आणि सरिता या दोन महिला नक्षलवाद्यांना चकमकीत ठार केले. या चकमकीनंतर घटनास्थळावरून शस्त्रास्त्रांसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. चकमकीत ठार झालेली सुनीता भोरम एरिया कमांडर म्हणून कार्यरत होती. तर सरिता नक्षलवादी कबीरची रक्षक होती. त्यासोबत ती खट्या मोचा दलममध्ये राहत होती. सध्या ती विस्तार दलममध्ये सक्रिय होती. दोघींचेही मृतदेह सुरक्षा दलाने ताब्यात घेतले आहेत.
या कारवाईवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ‘मी पोलीस दल आणि कृती दलाचे विशेष अभिनंदन करतो’ असे स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी चकमकीशी संबंधित इतर माहितीही दिली. मध्यप्रदेशातील गेल्या दीड वर्षातील ही चौथी चकमक होती. आतापर्यंतच्या कारवायांमध्ये आठ नक्षलवादी मारले गेले असून त्यांच्यावर 8 कोटींचे बक्षीस होते. आपल्या सुरक्षा दलामध्ये शौर्य आणि सतर्कता असल्यामुळे नक्षलवाद्यांचा सातत्याने खात्मा होत आहे. कायद्याचे राज्य निर्माण करण्याचा आमचा संकल्प असून येथे दरोडेखोरांना थारा दिला जाणार नाही. नक्षलवादी बचावू शकणार नाहीत. सिमीनंतर आता पीएफआयसारख्या संघटनांचा नायनाट केला जात आहे. शांतता बिघडवणाऱ्या गुंडांना आणि बदमाशांना सोडले जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
जंगलभागात शोधमोहीम
मृत नक्षलवाद्यांकडून बंदुका, काडतुसे, मोठ्या प्रमाणात नक्षलवादी साहित्य आणि खाण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. दोन्ही महिला नक्षलवाद्यांवर प्रत्येकी 14 लाख ऊपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. या घटनेनंतर बालाघाट पोलिसांनी जंगलात शोधमोहीम सुरू केल्याचे पोलीस अधीक्षक समीर सौरभ यांनी सांगितले. नक्षलवादी चकमकीत दोन ज्येष्ठ महिला नक्षलवादी ठार झाल्याची माहिती मिळताच बालाघाट झोनचे पोलीस महानिरीक्षक संजय कुमार, पोलीस अधीक्षक समीर सौरभ, हॉकफोर्सचे सीओ घटनास्थळी पोहोचले होते.









