दारूगोळा, शस्त्र जप्त : सहकाऱ्यांचा शोध सुरू
वृत्तसंस्था/नारायणपूर
छत्तीसगडमधील नारायणपूर जिह्यातील अबुझमद भागात जवानांनी दोन गणवेशधारी महिला नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. दोघांचेही मृतदेह हस्तगत करण्यात आले आहेत. त्याचबरोबर 315 बोअर रायफल आणि इतर शस्त्र देखील जप्त करण्यात आली आहेत. चकमकीची ही घटना कोहकामेता पोलीस स्टेशन परिसरात गुरुवारी घडली. कोहकामेता येथे झालेल्या चकमकीसाठी सुरक्षा दलांनी व्यापक मोहीम राबविली होती. नक्षलवाद्यांच्या माड विभागाच्या एका मोठ्या केडरच्या उपस्थितीची माहिती जवानांना मिळाली होती. यानंतर, डीआरजी नारायणपूर, कोंडागाव आणि एसटीएफने अबुझमदमध्ये शोधमोहीम सुरू केली. बुधवारी रात्री नक्षलवाद्यांची डीआरजी आणि एसटीएफ टीमशी चकमक झाली. या चकमकीत जवानांनी 2 महिला नक्षलवाद्यांना ठार मारले. चकमकीनंतर जवानांच्या पथकाने संपूर्ण परिसरात शोध घेतल्यानंतर महिला नक्षलवाद्यांचे मृतदेहही सापडले आहेत. या भागात गुरुवारी दिवसभर शोधमोहीम राबवून महिला नक्षलींच्या सहकाऱ्यांचा शोध घेतला जात होता. एसपी रॉबिन्सन गुरिया यांनी चकमकीची पुष्टी केली आहे.









