साडेआठ लाखांचे दागिने जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
बसमध्ये चढताना महिलांच्या बॅगमधील दागिने चोरणाऱ्या सोलापूर येथील दोन महिलांना अथणी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून साडेआठ लाख रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
अथणी बसस्थानकावर गर्दीच्या वेळेला महिलांचे दागिने चोरल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अथणीचे पोलीस उपअधीक्षक श्रीपाद जलदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र नायकोडी, पोलीस उपनिरीक्षक राकेश बगली, पी. बी. नाईक, ए. ए. इरकर, एम. ए. पाटील, जे. एच. डांगे, एम. एन. खोत, जे. आर. असोदे, सविता कत्ती, विनोद ठक्कन्नवर आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे.
तिप्पव्वा लक्ष्मण जाधव (वय 50), विमला देवाप्पा गायकवाड (वय 45) दोघेही राहणार विमुक्ती झोपडपट्टी, सोलापूर अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. सोलापूरहून येऊन अथणी बसस्थानकावर महिलांच्या बॅगमधील दागिने त्या चोरायच्या. या महिलांनी एकूण चार गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्यांच्याजवळून 8 लाख 59 हजार रुपये किमतीचे 150 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
अथणी बसस्थानकावर संशयास्पदरीत्या फिरताना तिप्पव्वा व विमला यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी दागिने चोरल्याची कबुली दिली. या जोडगोळीने आणखी कोणत्या ठिकाणी गुन्हे केले आहेत का? याचा तपास करण्यात येत आहे. खासकरून बसस्थानकावरील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या बॅगमधील दागिने चोरण्यात येत होते, असे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.









