हिरेबागेवाडी पोलिसांची कारवाई : पाच दुचाकी जप्त
बेळगाव : बेळगाव, बैलहोंगलमध्ये मोटारसायकली चोरणाऱ्या एका युवकाला अटक करून त्याच्याजवळून चोरीच्या पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. हिरेबागेवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आजाद मेहबूबसुबानी किल्लेदार (वय 31, रा. तिगडी ता. बैलहोंगल) असे त्याचे नाव आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हिरेबोगवाडीचे पोलीस निरीक्षक टी. बी. निलगार, पोलीस उपनिरीक्षक अविनाश ए. वाय., पोलीस उपनिरीक्षक एस. आर. मुतत्ती, हवालदार एस. बी. बाबनावर, पी. एस. बुसी, आर. एस. केळगीनमनी, तांत्रिक विभागाचे रमेश अक्की, महादेव अक्की आदींनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी आजादला संशयास्पदरित्या फिरताना ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने बेळगाव शहर व बैलहोंगलमध्ये चोरी केल्याची कबुली दिली आहे. विविध ठिकाणी त्याने चोरलेल्या पाच हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. सर्व ठिकाणाहून त्याने हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकलीच चोरल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.









