12 हून अधिक कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका
वृत्तसंस्था/ आसनसोल
पश्चिम बंगालमधील आसनसोलमध्ये सोमवारी एका मोटरसायकल शोरूमला आग लागली. शोरुममधील नव्या-कोऱ्या गाड्यांसह विविध वस्तू आगीत भस्मसात झाल्या असून कोट्यावधींचे नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे. आगीमागील नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. या दुर्घटनेदरम्यान शोरूममधून 12 हून अधिक कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आसनसोलमध्ये सलनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समदी गावात सोमवारी सायंकाळी ही भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले असून दुसऱ्या मजल्यापर्यंत आगीच्या ज्वाळा पसरल्याचे दिसून येत आहेत.









