सप्टेंबरमध्ये बजाजने विकल्या 2 लाख 2510 दुचाकी, टीव्हीएसचीही दमदार कामगिरी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उत्सवी काळाला मागच्या अर्थात सप्टेंबर महिन्यात सुरुवात झाली असून वाहन विक्रीचा विचार करता दुचाकींची विक्री समाधानकारक राहिली असल्याचे पाहायला मिळाले आहे. बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प व टीव्हीएस यांनी आपली सप्टेंबरमधील दुचाकी विक्रीची आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे.
बजाज ऑटोची कामगिरी
बजाज ऑटोने सप्टेंबर 2023 महिन्यात 2 लाख 2510 दुचाकींची विक्री करण्यात यश मिळवलं आहे. पल्सर, प्लॅटीना, सीटी 100 या दुचाकींच्या लोकप्रियतेमुळे कंपनीने आर्थिक 2023-24 वर्षात पहिल्या 6 महिन्यात 17 लाख 70 हजार 913 दुचाकींची विक्री केली आहे. 2 लाखपेक्षा अधिकच्या दुचाकी सप्टेंबर 2023 मध्ये कंपनीने विकल्या असल्या तरी मागच्या तुलनेत विक्री तशी 9 टक्के इतकी वार्षिक तत्वावर कमीच राहिली आहे. मागच्या वर्षी याच महिन्यात 2 लाख 22 हजार 912 दुचाकींची विक्री कंपनीने केली होती. याचवर्षी कंपनीने ऑगस्ट महिन्यात 1 लाख 60 हजार 820 दुचाकींची विक्री केली आहे. तर 1 लाख 25 हजार 202 दुचाकींची निर्यात कंपनीने केली आहे.
टीव्हीएसने नोंदली 6 टक्के वाढ
तर टीव्हीएस या दुचाकी क्षेत्रातील आणखी एका दिग्गज कंपनीनेही सप्टेंबर महिन्यात दुचाकी विक्रीत समाधानकारक कामगिरी पार पाडली आहे. टीव्हीएसने सप्टेंबर 2023 मध्ये 4 लाख 2553 दुचाकींची विक्री केली असून मागच्या तुलनेत विक्रीत 6 टक्के इतकी वाढ झाली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये कंपनीने 3 लाख 79 हजार 11 दुचाकींची विक्री केली होती. देशांतर्गत दुचाकी विक्री सप्टेंबर 2023 मध्ये 3 लाख 493 इतकी राहिली होती. मोटरसायकल विक्रीत 10 टक्के इतकी वाढ सप्टेंबरमध्ये झाली आहे. सप्टेंबर महिन्यात कंपनीने 1 लाख 86 हजारहून अधिक मोटरसायकलची विक्री केली आहे. मागच्या वर्षी याच महिन्यात 1 लाख 69 हजारहून अधिक मोटरसायकलची विक्री झाली होती.
हिरो मोटोकॉर्पने गाठला 5 लाखाचा आकडा
हिरो मोटोकॉर्पनेही आपली सप्टेंबरमधील विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. मोटरसायकल व स्कुटर गटातील कंपनीची कामगिरी चांगली राहिली आहे. उत्सवी काळामुळे सप्टेंबरमध्ये वाढ दिसून आली आहे. स्प्लेंडर, पॅशन व प्लेझर सारख्या दुचाकींना ग्राहकांची पसंती लाभली आहे. सप्टेंबरमध्ये कंपनीने 5 लाख 36 हजार 499 इतक्या दुचाकींची विक्री करण्यात यश मिळवलं आहे. मागच्या सप्टेंबर 2022 च्या तुलनेत वाढ 3 टक्के इतकी नोंदली गेली आहे. याआधीच्या म्हणजेच ऑगस्ट 2023 मध्ये 4 लाख 88 हजार 717 दुचाकींची विक्री कंपनीने केली होती.









