महिलेचा जागीच मृत्यू
पलूस
पलूस येथील आंधळी रोडवर समर्थ हॉस्पिटल समोर भरधाव डंपरचा मोपेडला धक्का लागल्याने अपघात झाला. यात वीटभट्टी कामगार महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास घडला. याबाबत मयत हिचा पती सुनील रमेश माने यांनी पलूस पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे. सोनम सुनील माने असे मयत महिलेचे नाव आहे. तर अमित शामराव शिंदे (42, रा. पलूस) असे डंपर चालकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी दुपारी सुनील रमेश माने याचा साडू भाऊ लखन पवार हा सोनम सुनील माने (24, रा. आंधळी फाटा, मूळ रा. म्हसवड ता. माण जि. सातारा) हिला दुचाकीवरुन घेऊन पलूसहून आंधळीकडे निघाला होता. याच दरम्यान समर्थ हॉस्पिटल समोर आले असता मोटारसायकलला डंपरचा (एम. एच. 12 क्यु डब्ल्यू 8437) धक्का लागला. यामध्ये मोटारसायकल स्लिप होवून दोघेही रस्त्यावर पडले. मागे बसलेल्या सोनम माने या डंपरच्या मागील चाकाखाली सापडल्या. त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळावर मोठी गर्दी जमली होती. या घटनेची माहिती पोलिसाना समजताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. अधिक तपास पलूस पोलीस करीत आहेत.
Previous Articleडुप्लिकेट चावीचा वापर करून साडेचार लाखांचा ऐवज लंपास
Next Article मुरगुडच्या अपेक्षाने जिंकला हिंदू गर्जना केसरी किताब








