वार्ताहर /उचगाव
उचगाव येथील मळेकरणी देवीच्या यात्रेसाठी दुचाकीवरून आलेल्या युवकाने साईड काढायच्या नादात टेम्पोला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सदर युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार दि. 16 मे रोजी दुपारी साडेतीनच्या सुमाराला घडली. सदर घटना उचगाव अॅप्रोच रोडवर घडली. घटनेची अधिक माहिती अशी की, बाकनूर येथील युवक दुचाकी वाहन नं. केए 23 ईव्ही 97 86 या वाहनावरून मळेकरणी देवीला यात्रेसाठी आला होता. सदर युवक परत जात असताना एका वाहनाला साईड काढून पुढे जाण्याच्या धडपडीमध्ये टेम्पोला जाऊन आदळल्याने त्याच्या डोकीला गंभीर मार लागला असून गाडीच्या समोरील भागाचाही चक्काचूर झाल्याचे दिसून येत होते. मंगळवारी मळेकरणी देवीच्या यात्रेला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी उसळली होती. उचगाव फाटा ते मळेकरणी देवस्थानपर्यंतचा मार्ग पूर्णत: नागरिकांच्या दुचाकी व चारचाकी वाहनाने जाम झाल्याचे चित्र दिसून येत होते. अशा या उचगाव अॅप्रोच रोडवर सदर अपघात घडला. सदर युवकाला त्याच टेम्पोतून जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याचे समजते. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात होते. त्याच्या डोकीला जबर मार लागल्याने घटनास्थळी बरेच रक्तही पडल्याचे दिसून येत होते.









