प्रतिनिधी/ सातारा
खिंडवाडी (ता. सातारा) गावच्या हद्दीत भरधाव मोटरसायकलवरील चालकाने कंटेनरला पाठीमागून भिषण धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आदेश विलास साळुंखे (वय 20, रा. मुळ पाटण, सध्या नागठाणे सातारा), पारस संभाजी ढसळे (वय 16, रा. नागठाणे) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आदेश साळुंखे व पारस ढसळे हे एकाच मोटरसायकलवरुन भरधाव वेगाने निघाले होते. यावेळी खिंडवाडी गावच्या हद्दीत रॉयल ऍकॅडमीच्यासमोर कोल्हापूर ते पुणे जाणाऱया मार्गावर ते पोहोचले. यावेळी पुढे कंटेनर निघाला होता. या कंटेनरला ते पाठीमागून धडकले. या भिषण धडकेत आदेश यांचा जागीच मृत्यू झाला. तर पारस हा गंभीर जखमी झाला. परिसरात बघ्याची गर्दी झाली. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पारस याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. याची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.









