अक्कतंगेरहाळ गावातील घटनेने गोकाक तालुका हादरला
बेळगाव : अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन पतीने पत्नीचा खून करून त्यानंतर संशय घेतलेल्या युवकाचाही खून केल्याची धक्कादायक घटना गोकाक तालुक्यातील अक्कतंगेरहाळ येथे मंगळवारी घडली आहे. भरदुपारी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ माजली आहे. मल्लिकार्जुन जगदार (वय 40), रेणुका यल्लाप्पा माळगी (वय 42, दोघेही रा. अक्कतंगेरहाळ) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. रेणुका हिचा पती यल्लाप्पा लक्काप्पा माळगी (वय 45) याने संशय घेऊन या दोघांचा खून केला आहे. रेणुका आणि यल्लाप्पा यांचा विवाह बारा वर्षांपूर्वी झाला होता. त्यानंतर यल्लाप्पा हा रेणुकावर संशय घेत होता. मल्लिकार्जुन याच्याबरोबर तिचे अनैतिक संबंध आहेत, म्हणून त्यांच्यामध्ये वारंवार खटके उडत होते. मंगळवारीही या दोघांमध्ये भांडण झाले. यामुळे संशयित आरोपी यल्लाप्पाने आता तुम्हा दोघांनाही संपवितो, असे म्हणून घरातील विळा घेऊन पत्नीवर घरातच सपासप वार केले. या हल्ल्यात पत्नी जागीच ठार झाली. त्यानंतर त्याने तोच विळा घेऊन मल्लिकार्जुन जगदार याच्या घराकडे धाव घेतली. त्याठिकाणी मल्लिकार्जुन हा अंघोळ करत होता. त्याच्यावर त्याने हल्ला केला.
विळ्याने सपासप वार
अचानक विळा घेऊन हल्ला केल्यामुळे मल्लिकार्जुनने आपला जीव वाचविण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे तो घराच्या बाहेर आला. त्याठिकाणीच त्याचा विळ्याने सपासप वार करून खून केला. दोन्हीही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. या घटनेनंतर यल्लाप्पा हा स्वत:च अंकलगी पोलीस स्थानकामध्ये जाऊन हजर झाला. या घटनेनंतर अंकलगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. या घटनेमुळे अक्कतंगेरहाळ गावामध्ये मोठी गर्दी झाली होती. याचबरोबर तणावही निर्माण झाला होता. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. रात्री उशिरापर्यंत संशयित आरोपीवर गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंकलगी पोलीस पुढील तपास करीत आहेत.









